महाराष्ट्र सरकार वाधवान बंधूंना सीबीआय आणि ईडीच्या ताब्यात देणार – अनिल देशमुख

मुंबई – टाळेबंदी, प्रवेशबंदीचा आदेश मोडून महाबळेश्वरमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न केलेले वादग्रस्त उद्योगपती कपिल वाधवान त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना विलगीकरणानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाने तसेच केंद्राकडून अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका हायस्कूलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

हा कालावधी आज (२२ एप्रिल २०२०) रोजी संपत असून त्यानंतर त्यांना ईडी आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे अशी विनंती आम्ही संबंधित संस्थाना केली असल्याचे, देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

“आज दुपारी दोन वाजता वाधवान कुटुंबाचा क्वारंटाइनचा वेळ संपतोय. याच पार्श्वभूमीवर आम्ही सीबीआय आणि ईडीने त्यांना ताब्यात घ्यावे अशी विनंती आम्ही केली आहे.

आज दुपारी दोनपर्यंत सीबीआयच्या, ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांना घेऊन जावे. तोपर्यंत हे कुटुंब आमच्याच ताब्यात राहील,” असं देशमुख यांनी सांगितलं.