Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज करोनाचे 841 नवे रुग्ण, 34 मृत्यू; बाधितांची संख्या 15 हजारांवर

महाराष्ट्रात आज करोनाचे 841 नवे रुग्ण, 34 मृत्यू; बाधितांची संख्या 15 हजारांवर

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात 841 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 15 हजारांहून अधिक झाली आहे.
राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, करोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. आज दिवसभरात 841 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या 15,525 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 354 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 2819 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या 24 तासांत 34 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 26 रुग्ण हे मुंबईचे आहेत. एका दिवसातील मुंबईतील मृत्यूचा हा आकडा सर्वाधिक आहे. पुण्यातील सहा रुग्णांचा, तर औरंगाबाद आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या 617 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज झालेल्या 34 मृत्यूंपैकी 24 पुरुष आणि 10 महिला रुग्ण आहेत. 60 वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील 14 रुग्ण, 40 ते 59 वयोगटातील 16 रुग्ण आणि चार रुग्ण 40 वर्षाखालील आहेत. यापैकी 28 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. मुंबई महापालिका हद्दीतील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 945 झाली असून, आजातागायत मुंबईत करोनाबळींची संख्या 387 झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत करोनाबाधित एकूण रुग्णसंख्या 1 हजार 836 असून, पुण्यात 112 रुग्णांचा मृत्यू झाला, असंही त्यांनी सांगितले.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 82 हजार 884 नमुन्यांपैकी 1 लाख 67 हजार 205 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. 15 हजार 525 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 99 हजार 182 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, 12 हजार 456 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणली जात आहे. राज्यात सध्या 943 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण 11 हजार 629 सर्वेक्षण पथकांनी काम केले. या पथकांनी 50.81 लोकांचे सर्वेक्षण केले असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या