सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुट्टी नाही, लोकलही बंद नाहीत

सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुट्टी नाही, लोकलही बंद नाहीत

मुंबई : प्रतिनिधी 

मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोरोना व्हायरसबाबत महत्वपूर्ण चर्चा पार पडली. बैठक सुरु असताना राज्यातील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याबाबत बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच लोकलदेखील बंद राहणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, रेल्वेमध्येही अनावश्यक गर्दी टाळावी असे ठाकरे यांनी आवाहन करत जर गर्दी वाढली तर कठोर पावले उचलावी लागतील असा इशाराही ठाकरे यांनी याप्रसंगी दिला.

राज्यात करोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण असून दुर्दैवाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, यापैंकी एका रुग्णाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. बस किंवा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. गर्दी न ओसरल्यास आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील असे ठाकरे म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतरांनी दुकाने बंद ठेवावीत. जनेतेने स्वतःहून स्वयंशिस्त पाळायला हवी. जनतेने अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे. जर असे झाले नाही तर मुंबईची लोकल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असेही ठाकरे याप्रसंगी म्हणाले.

तसेच सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुट्टी देण्यात आलेली नाही. ५० टक्के उपस्थितीबाबत आम्ही विचार करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com