राष्ट्रवादीची बैठक संपली; सर्व अधिकार शरद पवारांना, कॉंग्रेससोबत सायंकाळी चर्चा
Share

मुंबई | प्रतिनिधी
आज राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी बैठकीत संपूर्ण अधिकार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात आले आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. यामुळे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आज सायंकाळी मुंबईत येतील त्यांच्याशी चर्चा करून राज्यपालांना भेटण्याचे नियोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आले.
आज राष्ट्रवादी ५४ आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यशवंतराव चव्हाण येथे ही बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते. बैठकीत शरद पवार, जयंत पाटील व अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत सरकार ठरविण्यासाठी सर्व अधिकार शरद पवारांना दिले आहेत. एक समिती तयार करण्यात येणार असून ही समिती सत्तास्थापनेबाबत निर्णय देणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीला आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत मुदत आहे त्याच्याआधीच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. याआधी शरद पवार यांच्याशी कॉंग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. कॉंग्रेस नेते अहमद पटेल, वेणुगोपाल व मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत चर्चेसाठी येणार आहेत.
सायंकाळी त्यांच्यासोबत चर्चा होईल त्यानंतर आगामी सत्ता स्थापन करण्याबाबत निर्णय होणार आहे. तीन पक्ष एकत्रित आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही हेदेखील नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, आम्हाला जनतेने बहुमत दिले नाही. त्यामुळे तीन पक्षांना एकत्र यावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.