Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९ सार्वमत

विधानसभा २०१९ : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Share

आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण गरम

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या 12 दिवसांपासून सुरू असणारा जिल्ह्यातील राजकीय धुराळा आज (शनिवारी) सायंकाळी 5 वाजता शांत होणार आहे. सोमवारी विधानसभेच्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघांत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुरूवातीला एकतर्फी वाटणार्‍या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात जान आणल्याने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत रंगतदार लढती होणार आहेत.

विधानसभेच्या 12 जागांसाठी 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर 7 तारखेला माघारीनंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी बहुतांशी ठिकाणी दुरंगीच लढती आहेत.

निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. उदयनराजे, शिवसनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, आ. निलम गोर्‍हे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, भापकचे नेते देशाचे युवा नेते कन्हैयाकुमार, भालचंद्र कांगो, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आ. इमतीयाज जलील, यांच्यासह राजकीय नेत्यांच्या सभा, रॉली, रोडशो यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली. राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले.

जिल्ह्यात प्रमुख्याने निळवंडे, मुळा, कुकडीच्या पाण्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. यासह बेरोजगारी, एमआयडीसी, नगर शहरातील आयटी पार्क, सामान्य नागरिकांना संरक्षण या विषयांवर रंगतदार चर्चा झाली. यासह शेतमालाचा भाव, कांदा दर, नोटबंदीनंतरची स्थिती, शेतकरी कर्जमाफी राबवितांना झालेला त्रास, शेतकरी आत्महत्या या प्रश्‍नांवर सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्यात आले.

तर सत्ताधार्‍यांनी काश्मिर, 370 कलम, देशाची सुरक्षा व्यवस्था आणि पाच वर्षात केलेल्या विकास कामे आणि सुधारणा याव्दारे विरोधकांना उत्तर दिलं गेले. तसेच घाट माथ्यावर पडणारे पाणी वळवून जिल्ह्यातील सिंचन विषय मार्गी लावण्याचे वचन देण्यात आले. नेवासा, पारनेर, राहुरी, श्रीरामपूरसह अन्य मतदारसंघातही फोडाफोडीचे राजकारण झाले.

दरम्यान, जिल्ह्यात निवडणूका खुल्या, निर्भय, शांततामय, न्याय वातावरणात व सुरळीतपणे मतदान पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा महसूल हद्दीच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून रविवारी मतदान साहित्य घेवून अधिकारी आणि कर्मचारी गावागावातील मतदान केंद्रात पोहणार आहेत. मतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आतील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही.

विशिष्ट उमेदवारास मत न देण्याबद्दल मतदाराचे मन वळवता येणार नाही, शासकीय सुचने व्यतिरिक्त निवडणुकीशी संबंधित अशी कोणतीही सूचना अथवा खूण प्रदर्शित करत येणार नाही. मतदान केंद्रामध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा त्याच्या आसपासच्या भागातील कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनिक्षेपक अथवा ध्वनिवर्धक वाजविता येणार नाही, मतदान केंद्र परिसरात सार्वजनिक अथवा खाजगी जागेत आरडाओरड अथवा गैरशिस्तीने वागता येणार नाही.

मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्या परिसरात मंडप उभारण्यास तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या लावण्यात येणार नाही. मतदान केंद्र परिसरातील दुकाने, आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.

मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी वगळता इतरांना सेल्युलर फोन, कॉडलेस फोन नेण्यास परवानगी नाही. मतदारांना ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहने वापरास निर्बंध घालण्यात आला आहे. मतदार चिठ्ठीसाठी साधा पांढरा कागद असावा ज्यावर उमेदवार किंवा पक्षाची खूण वा चिन्ह असू नये. सुरक्षा कवच असलेले लोकप्रतिनिधी उमेदवाराचे मतदार प्रतिनिधी असणार नाही. राजकीय पक्षाचे इतर मतदार संघातील कार्यकर्ते व राजकीय व्यकती जे येथील विधानसभा मतदारसंघातील मतदार नाहीत, त्यांना मतदार संघात थांबता येणार नाही, असे या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
………………..
कर्जतमध्ये हॉट सांगता
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ‘हॉट’ लढाई म्हणून ओळखली जाणार्‍या कर्जत जामखेड मतदारसंघात आज शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सांगता सभा होणार आहे. दोन्ही मोठे नेते एकाचवेळी येत असल्याने प्रशासनाचीही तारेवरची कसरत होणार आहे. ………………….
जिल्ह्यात संगमनेर आणि शिर्डी वगळात अन्य मतदारसंघात तुल्यबळ लढती होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यमान आमदारांच्या पायाला भिंगरी बांधून मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रचारात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला.
………………….
पोलीसांसह निवडणूक विभागाची करडी नजर
विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचारसंपल्यानंतर सोशल मीडियावर प्रसारित होणारे मेसेज याव्दारे आचरसंहिता भंग पावणार नाही, याची पुरेपूर दक्षता निवडणूक यंत्रणेव्दारे घेण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!