महाऑनलाईनच्या सर्व्हरचा सावळा गोंधळ ; विद्यार्थी पालकांना मनस्ताप

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी – ऑनलाईन व्यवहारांचा आग्रह धरणार्‍या शासनाला स्वत:चा अत्यंत महत्त्वाचा महाऑनलाईनचा सर्व्हर दुरुस्त करणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सोमवारी पुन्हा सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन असल्याने दाखलेची निकाले नाही.

शाळा-महाविद्यालयांचा ऐन प्रवेशाचा कालावधी असल्यामुळे आता दाखल्यांची समस्या तीव्र झाली असून ती सोडविण्यासाठी मुंबईतील महा-ऑनलाचे वरीष्ठ अधिकारीही आज (ता.20 ) नाशिकमध्ये दाखल होणार आहे.

दहावी-बारावीचे निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखल्यासाठी सध्या विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी व दाखले वाटपामध्ये होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने दाखले ऑनलाईनच देणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये दाखला देणे बंधनकारक आहे.

दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थी व पालकांनी सेतू केंद्रांमध्ये विविध दाखल्यासाठी अर्ज करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी चांगलेच अडचणी सापडले आहेत. शासनाच्या सवलती मिळविण्यासाठी जातीच्या दाखल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला जमा करणे गरजेचे असते.

अन्यथा सवलत मिळत नाही. सर्व्हर डाऊन असल्याने मुदतीत अर्ज करून देखील दाखले मिळण्यास अडचण येत आहे. काही अंशी महा-ऑनलाईनचे सर्व्हर सुरु झाले पण, दाखलेच निकाली निघण्यास अडचणी येत होत्या.

त्यानंतर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डीटीईच्या प्रवेशासाठी 17 जून ही अंतिम मुदत असल्याने आणि उत्पन्नासोबतच नॉन क्रिमिलिअरच्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.

अक्षरशः अधिका-यांच्या दालनात बसून विद्यार्थ्यांनी दाखले पदरात पाडून घेतले. परंतु आता अकरावीच्या प्रवेशाची केंद्रीय पध्दतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सध्या सुरु आहे. 27 जून ही अंतिम मुदत आहे.

त्यातच सोमवारी पुन्हा एकदा महा-ऑनलाईनच्या सर्व्हरने धोका दिल्याने आणि अत्यंत संथ सुरु असलेल्या इंटरनेटने अधिकारीही हतबल झाले आहेत.

त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी महा-ऑनलाईनचे वरीष्ठ अधिकारी मंगळवारपासून नाशकात तळ ठोकून राहाणार असल्याने अधिका-यांचा जीव भांड्यात पडला असून, विद्यार्थ्यांनाही वेळेत दाखले मिळण्याची शक्यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

*