भगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत

0

कराड यांनी घेतली बैठक, आंदोलन सुरू झाल्याची घोषणा
भगवानगड एका जातीचा नाही : नामदेवशास्त्रींची टीका

पाथर्डी (प्रतिनिधी)- पुण्यतिथीनिमित्त भगवान गडावर भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, गडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड वंजारी समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मेळावा घेणार होते. मात्र आरक्षण मेळाव्यावरून नामदेव शास्त्री यांनी विरोध व्यक्त केल्याने, वाद होणार हे निश्चित होते.

याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. या सर्व परिस्थितीत पाथर्डीला भगवान बाबांची 122 वी पुण्यतिथी पार पडली. वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घेण्यात यावे यासाठी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. त्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला होता. त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे होती. मात्र, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने

या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अखेर वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून फुलचंद कराड भगवान गडावर दाखल झाले होते. यावेळी भगवान बाबांच्या समधीचे दर्शन घेतले, कार्यकर्त्यांसोबत अवघ्या काही मिनिटाची बैठक पार पडून, कराड यांनी प्रतिकात्मक बैठक घेतल्याचे सांगून 16 सप्टेंबरला पुण्यात व्यापक मेळावा घेऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवानगडावर येऊन मंदिराच्या आत आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन ती अवघी दोन मिनिटात गुंडाळली.
कराड यांची भगवान गडावर बैठक होऊ देऊ नये अशी मागणी नामदेवशास्त्री यांनी प्रशासनाकडे केल्या नंतर प्रशासनाने जमावबंदी आदेश गडावर लागू केला होता. मात्र आपण बैठक घेतली असून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन आत्तापासून सुरु झाल्याचे नंतर पत्रकारांशी बोलताना कराड यांनी जाहीर केले. यावेळी नामदेवशास्त्री यांच्यावर सुद्धा कराड यांनी टीका केली.

वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भगवानगडावर फुलचंद कराड हे बैठक घेणार असून ती रद्द करावी अशी मागणी दोन दिवसांपूर्वी गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी केली होती. ही मागणी करताना कराड यांची ही कृती म्हणजे हा एका राजकीय कटाचा भाग असून या मागे पंकजा मुंडे यांचा हात असल्याचा आरोप मुंडे यांचा नामोल्लेख टाळून नामदेवशास्त्री यांनी केल्याने आज भगवानगडावर नेमके काय होणार याकडे भगवानबाबा भक्तांचे लक्ष लागून राहिले होते.

सकाळ पासूनच गडाकडे येणार्‍या दोन बाजूच्या रस्त्यावर व भगवानगडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान कराड हे जवळपास दीडशे कार्यकर्त्यांसमवेत गडावर दाखल झाले. कोणतीही घोषणाबाजी न करता ते गडावरील मंदिरात शांततेत गेले व बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांनी कार्यकर्त्यांना खाली बसवत आज आपण बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून आजपासून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन सुरु झाल्याचे जाहीर करत बैठक आटोपती घेतली.

यानंतर गडाच्या बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले कि वंजारी समाजाला एन. टी. मध्ये टाकल्याने केवळ दोन टक्के आरक्षण मिळाले असून त्या मुळे वंजारी समाजावर अन्याय झाला आहे. पुन्हा एकदा आमचा समावेश ओबीसीत करावा. भगवानबाबा आमचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मंदिराच्या आवारात बैठक घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनाला कोणाही राजकीय नेत्याचा पाठिंबा नसून पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत.या विषयावर मी त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोललेलो नाही.

आम्ही आमच्या पद्धतीने लढत आहोत. मराठा समाजाचे आंदोलन सुद्धा नेत्यांशिवाय झाले आहे. सरकार जरी आमचे असले तरीही त्यांनी लवकर आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते मिळवू. आंदोलनाची सुरवात गडावरून सुरु करताना गडावर वाद निर्माण करण्याचा आपला हेतू नाही. गडावरील स्टेज नामदेवशास्त्री यांनी पाडत येथे माईक बंदी करून स्वतःची आचारसहिंता लागू केली आहे. मी येथे मते मागण्यासाठी आलेलो नाही.एखाद्या गावात पाटलाच्या वाड्यावर बैठक होऊन तेथे सुद्धा मते मागितली जातात मात्र त्यामुळे आचार संहितेचा भंग होत नाही मग मी बैठक घेतली तर भंग कसा होतो.

गडावर होणारा दसरा मेळावा नामदेवशास्त्री यांनी बंद केला मग वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर ते येथे मेळावा घेऊन देणार नाही हे न समजण्या इतका मी दुधखुळा नाही मात्र एक दिवस असा येईल की वंजारी समाजाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर आरक्षणाच्या मागणीसाठी उतरल्यानंतर स्वतः नामदेवशास्त्री या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे आपल्याला पहावयास मिळेल.

या वेळी गोविंद शिंगारे,अंकित मुंडे,परमेश्वर मुंडे,बाळू आढाव,सुनील गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती.

कराड यांच्या आरोपांविषयी बोलताना नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानगड हा जातीपातीच्या विरहित आहे. हा गड केवळ एका समाजाचा नसून तो सर्व समाजाचा आहे. या ठिकाणी बैठका घेऊन किंवा मेळावा आयोजित करून कोणीही गडाच्या शांततेचा भंग करू नये.

देवस्थान व भगवानबाबांच्या भक्तांना वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे असून तो एक प्रकारचा अपराध आहे. एखाद्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गड नसून तो शुद्ध वारकर्‍यांचा आहे. हे ठिकाण सामाजिक नसून ते अध्यात्मिक आहे.

वंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भगवानगडावर मेळावा आयोजित केला असल्याचे आपल्याला वृत्तपत्रातील बातम्यातून समजल्याने आपण प्रशासनाला मेळावा होऊ देऊ नये असे पत्र दिले. आज प्रशासनाला मोठा ताण सहन करावा लागला असून प्रशासनाने गडाला जी साथ दिली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी असल्याचे शेवटी नामदेवशास्त्री म्हणाले.

 पुण्यात ठरणार पुढील दिशा – 
वंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुणे येथे 15 सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली असून त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल.आम्हाला आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व पंकजा मुंडे यांना देणार असल्याचे यावेळी कराड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*