मळणीयंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

0

वडाळा बहिरोबा येथे सोयाबीनचे खळे करताना सायंकाळी घडली घटना 

नेवासा (प्रतिनिधी) – सोयाबीनचे खळे करताना मळणीयंत्रात ओढले जाऊन अडकलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे काल रविवारी सायंकाळी घडली असून यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पावसाचे वातावरण तयार झाल्याने वडाळा बहिरोबा शिवारातील खरवंडी रस्त्यावरील एका शेतात सोयाबीनच्या खळ्याची लगबग सुरु असताना भिमबाई मारुती जाधव (वय 50, रा. वडाळा बहिरोबा) ही महिला मळणीयंत्रात खेचली जाऊन अडकल्याने गंभीररित्या जखमी झाली. रविवारी सायंकाळी 5.30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी उपस्थित इतर लोकांच्या काही लक्षात येण्यापूर्वीच अचानक ही घटना घडल्याने मोठा गोंधळ उडाला.

ही गोष्ट लक्षात आल्यानंतर उपस्थितांनी अचानक मोठी आरडा-ओरड केल्यानंतर चालकाने घाईघाईने मळणीयंत्र बंद केले. मळणीयंत्रात अडकलेल्या जाधव यांना मोठ्या मुश्कीलीने उपस्थितांनी बाहेर काढले. मळणीयंत्रात अडकल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणावर गंभीर स्वरुपाच्या जखमा होऊन रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांना अत्यवस्थ परिस्थितीतच भैरवनाथ पतसंस्थेच्या रुग्णवाहिकेतून वडाळा मिशन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्या मृत झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली असून पावसाची चिन्हे दिसू लागल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या काळजीने गडबड करणारे शेतकरी व शेतमजूर पुरेशी सावधगीरी बाळगत नसल्यानेच अशा दुर्दैवी घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पिक सोंगणीच्या निमित्ताने मळणीयंत्रांच्या सुरक्षितेतचा प्रश्‍नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

अनेक मळणीयंत्रे ही मृत्यूचे सापळेच असल्याचे आता शेतकर्‍यांमध्येच बोलले जाऊ लागले आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षेसाठी जाळी न लावता धोकादायक भाग सर्रास उघडा ठेऊन तसेच त्यावर काम करणार्‍यांना सावधगीरीच्या कुठल्याही सूचना न देता बेपर्वाईने काम केले जात असल्यानेच परिसरात अनेक स्त्री-पुरुष शेतकरी तसेच मजूरांना गंभीर स्वरुपाची दुखापत होऊन जीवाशी खेळ झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या घटनेत शेतात सोंगणीचे काम करणार्‍या महिलेवर काळाने असा क्रूर घाला घातल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जीवावर बेतणारी बेफिकीरी –  पिकांची मळणीयंत्राद्वारे खळे करताना संबंधितांकडून धोकादायक तसेच प्रसंगी जीवावर बेतणार्‍या पद्धतींचा सर्रास वापर करण्यात येतो. ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणी यंत्राच्या पट्ट्यात अडकल्यामुळेही अनेक दुर्घटना घडल्या आहेत. वीजेवर चालणार्‍या यंत्रासाठी शेतातून गेलेल्या वीज तारांवर सर्रास आकडे टाकून त्याची वायर धोकादायकरित्या शेतातून पसरत आणून खळे उरकले जाते. या वीज वाहक केबलला अनेक ठिकाणी जॉईंट दिलेले असतात. या उघड्या भागास स्पर्श झाल्यास विजेचा धक्का बसून जीव जाऊ शकतो. कधी कधी दोष निर्माण झाल्यास मशिनच्या लोखंडी भागात वीज प्रवाह उतरण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे खळे करताना यंत्राचे व वीज जोडणीची काळजी घेणेही आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

*