Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुलीने प्रेमविवाह केल्याने माता-पित्याने केले विष प्राशन

Share

राहुरी (प्रतिनिधी) – मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने मुलीचा पिता व भावाने सदर मुलीला राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाण केली. तर मुलीच्या माता पित्याने पोलीस ठाण्याच्या गेट जवळ विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 5 मार्च रोजी राहुरीत घडली असून आई व पित्याला तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील एका तरूणीचे तिच्या गावातच राहणार्‍या एका तरूणा सोबत प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजातील आहेत. मात्र घरच्या लोकांचा प्रेमविवाहाला विरोध असल्याने दोघांनी काही दिवसांपूर्वी घरातून पलायन केले. पळून गेल्या नंतर थेट आळंदी गाठली आणि त्या ठिकाणी कायदेशीर विवाह केला.

दरम्यान मुलीच्या घरच्यांनी सदर मुलगी हरविल्याची राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलीस तपास सुरू असताना दिनांक 5 मार्च रोजी सकाळी पळून गेलेले सदर तरूण व तरूणी लग्न केल्याचे प्रमाणपत्र घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाले. आळंदी येथे कायदेशीर विवाह केल्याचे पुरावे त्यांनी पोलिसांना दिले.

यावेळी पोलिसांनी सदर मुलीच्या घरच्यांना माहिती देऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. या मुलीचे वडील व भाऊ पोलीस ठाण्यात आले. मुलीने लग्न केल्याचे समजताच त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मुलीला मारहाण केली. काही लोकांनी मध्यस्थी करून भांडणे मिटविली. पोलिसांनी मुलीच्या घरच्यांची समजूत काढली. त्यावेळी ते निघून गेले. मात्र दुपारी दोन वाजे दरम्यान सदर मुलगी व मुलगा पोलीस ठाण्यात आले असताना मुलीचे आई व वडील विषारी औषधाची बाटली घेऊन आले आणि पोलीस ठाण्याच्या गेट जवळ दोघांनी औषध प्राशन केले.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन विष प्राशन केलेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटने बाबत दुपारी उशीरा पर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!