Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘लोकसभे’च्या तुलनेत विधानसभेच्या काळात दारू विक्री घटली !

Share

दहा हजारांची तफावत : 35 दिवसांत 21 लाख 53 हजार लिटर दारूची विक्री

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या 35 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात 21 लाख 53 हजार लिटर देशी-विदेशी आणि बियरची विक्री झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या 42 दिवसांच्या आचारसंहिता काळात 31 लाख 58 हजार लिटर दारूची विक्री झाली होती, तर विधानसभा निवडणुकीच्या 35 दिवसांच्या काळात 21 लाख 53 हजार लिटर दारूची विक्री झाली असून या दारू विक्रीत 10 हजार 4 लिटरने घट आली आहे.

राज्यात क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने अग्रेसर असणार्‍या जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनासोबतच दारू विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. निवडणुकांच्या काळात जिल्ह्यातील देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात येत असले तरी दारू विक्रीचे आणि पिण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. लोकसभा निवडणूक जिल्ह्यात दोन टप्प्यांत झालेली होती. आधी नगर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. तर त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. मात्र, या दोन्ही जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी आणि बियर केंद्र जिल्हा प्रशासनाने बंद ठेवले होते. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील परवानाधारक दारू विक्री करणार्‍यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

जिल्ह्यात 21 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला होता. त्यानंतर 25 ऑक्टोबरला निवडणूक आचारसंहिता संपली होती. या 35 दिवसांच्या काळात 21 लाख 53 हजार 533 लिटर दारू विक्री झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 10 हजार 4 लिटरने कमी आहे.

1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल पकडला
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीच्या काळात 1 कोटी 31 लाख रुपयांची दारू आणि मुद्देमाल जप्त केला आहे. यात 63 हजार लिटर विविध दारूचा समावेश आहे. यासह उत्पादन शुल्क विभागाने 237 गुन्हे दाखल केले असून यात 207 आरोपींसह 30 अज्ञात आरोपींवर गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील 186 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

45 हजार 420 लिटर देशी जप्त
जप्त करण्यात आलेल्या मद्यामध्ये जिल्ह्यात निवडणूक काळात 45 हजार 420 लिटर रसायन, 6 हजार 363 लिटर विदेशी दारूचा समावेश असून यासह 3 हजार 825 लिटर देशी दारू, 2 हजार 782 लिटर बियर, 2 हजार 233 लिटर गावठी आणि 1 हजार 746 लिटर ताडीचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!