साईज्योती महिला बचत गट प्रदर्शनाला यंदा ब्रेक !

करोनाचा फटका : 10 वर्षाची परंपरा खंडीत
 साईज्योती महिला बचत गट प्रदर्शनाला यंदा ब्रेक !

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना संसर्गामुळे यंदाचा जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन यंदा होणार

नाही. 10 वर्षानंतर महिला बचत गटांच्या या प्रदर्शनाला ब्रेक लागला असून करोना संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात पहिल्यांदा 2009-10 महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या साहित्य, माल, खाद्य पदार्थ, शोभेच्या वस्तू, मसाले, संद्रीय उपत्पादने, हस्तकला यांच्या साहित्यांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. सारडा महाविद्यालयाच्या पटांगणावर भरलेल्या या प्रदर्शनाला पहिल्याच वर्षी नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पुढील वर्षी विभागीय प्रदर्शन भरविण्यात आले. यात सहभागी 350 महिलांच्या साहित्य आणि वस्तूंची विक्री आणि खाद्य पदार्थ विक्रीतून 1 कोटी 12 लाखांची उलाढाल झाली. यामुळे राज्याचे लक्ष नगरकडे ओढले गेले. नगरच्या बचतांच्या महिलांनी पुढे विभागीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला आणि नगरचे नाव सर्वत्र झाले.

नगरच्या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद मिळता नाशिक विभागातील तब्बल पाच प्रदर्शन एकट्या नगरमध्ये घेण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे जामखेडच्या महिला बचत गटाने तयार केलेले पोलपाट लाटणे राज्यातील निम्म्या राजकीय व्यक्तींच्या घरात वापरली जात आहेत. संक्रांतीच्या काळात नगरला भरणार्‍या जिल्हास्तरीय अथवा विभागीय प्रदर्शनाकडे नगरकरांचे लक्ष असते. या ठिकाणी येणारे नागरिक खरेदीसोबत विविध खाद्य पदार्थ खाण्याचा आनंद लुटत असत. यंदा मात्र, महिला बचत गटाच्या प्रदर्शनाची ही परंपरा खंडीत होणार आहे. करोना संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने गर्दी न करण्याचे लादलेले निर्बंध यामुळे यंदाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

......................

आतापर्यंत 22 कोटींची उलाढाल

नगरला साईज्योती महिला बचतगट प्रदर्शन सुरू झाल्याच्या पहिल्या वर्षापासून गतवर्षीपर्यंत अंदाजे 21 कोटी 63 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे. प्रदर्शात सहभागी होणार्‍या शेकडो बचत गटांच्या हजारो महिलांना यानिमित्ताने रोजगार मिळाला होता. तर काही गटांना वर्षभराचे काम देखील मिळाले होते. लॉकडाऊन काळात याच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी कोट्यावधी रुपयांचे मास्क तयार करून त्यांची विक्री केलेली आहे.

.....................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com