दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे टपालाद्वारे मागणी

राजेश परजणे : हजारो पोस्टकार्ड पाठवून केला शुभारंभ
दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे टपालाद्वारे मागणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दुग्ध व्यवसाय सध्या अतिशय बिकट परिस्थितीमधून वाटचाल करीत असून दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गाईच्या दुधाला 30 रुपये दर, प्रती लिटरला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्यावे,

अशा मागण्या कोपरगाव तालुक्यातील दूध उत्पादकांनी पोस्टकार्डद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केल्या. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्याहस्ते संवत्सर येथे टपाल पेटीत पोस्टकार्ड टाकून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांनी टपालाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळण्याची मागणी केली. कोपरगांव तालुक्यातील हजारो दूध उत्पादकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दूध उत्पादकांनी आपापल्या गावातील टपाल कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पोस्टकार्ड पाठवून मागण्या मांडल्या.

चारा व पशुखाद्याचे दर गगनाला भिडालेले आहेत. परिणामी खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. राज्यस्तरावर दर वाढीबाबत काही तोडगा निघण्याऐवजी राजकारणच अधिक तापले आहे. शेतकरी व विविध संघटनांनी त्यासाठी आंदोलनेही केलीत.

परंतु महाविकास आघाडी सरकारला मात्र अजून जाग आलेली नाही. दूध दराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यास्तरावर दोनदा बैठकाही झालेल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा आरोप गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी यावेळी केला.

राज्य सरकारने दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी श्री.परजणे यांनी यावेळी केली. याप्रसंगी अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com