करोना रुग्णालय सुरू करा, अन्यथा तिरडी आंदोलन : खोरे

करोना रुग्णालय सुरू करा, अन्यथा तिरडी आंदोलन : खोरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित करोना चाचणी केंद्र, करोना तात्पुरते रुग्णालय सुरू करणे गरजेचे आहे.

नगरपालिका प्रशासन दिरंगाई करत असेल तर नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी प्रांताधिकार्‍यांना भेट देऊन आंदोलन करणार असल्याचे जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे, भाजयुमोचे विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी जाहीर केले.

श्री. खोरे यांनी सांगितले की, श्रीरामपूर नगरपालिकेने सर्वसामान्य करोना बाधित रुग्णांसाठी चाचणी केंद्र व तात्पुरते रुग्णालय सुरू करावे म्हणून आम्ही दीड महिन्यांपासून मागणी करत आहोत. एकीकडे अहमदनगर महानगरपालिका, संगमनेर, देवळाली प्रवरा नगरपालिका, शिर्डी नगरपंचायतने तेथील नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तर श्रीरामपूर नगरपालिका प्रशासन मात्र वेळकाढूपणा करत आहे. देवळाली-प्रवरा नगरपालिकेचे वार्षिक बजेट अवघे 30 कोटी रुपये आहे. तर श्रीरामपूर नगरपालिकेचे वार्षिक बजेट तब्बल 150 कोटी रुपये असूनही उदासिनता का ? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधकांनी 7 दिवस शहर बंद करूनही करोना साखळी तुटली नाही उलट नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे श्री. खोरे, श्री.गोराणे यांनी म्हटले आहे.

नगरपालिकेच्या मालकीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह, मेनरोडवरील आगाशे हॉल, विविध भागांतील शाळा सध्या रिकाम्या आहेत. त्या जागेत अथवा शहरातील एखाद्या मोठ्या रुग्णालयात नगरपालिकेने चाचणी केंद्र व करोना रुग्णालय तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. श्रीरामपुरात करोना सामूहिक संसर्गाकडे पसरत असल्याची भीती भाजयुमोचे विशाल यादव व अक्षय वर्पे यांनी व्यक्त केली.

करोना बाधित रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने खाजगी रुग्णालये अथवा लोणी, विळद घाट, नगर, पुणे येथे उपचारासाठी जावे लागत आहे. नागरिकांच्या जीवावर बेतल्यावर झोपलेले नगरपालिका प्रशासन जागे होणार नसेल तर नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांना भेट देऊन प्रशासकीय भवन श्रीरामपूर येथे जनविकास आघाडी व भाजपच्या पदाधिकार्‍यांसह तिरडी आंदोलन करणार असल्याचे मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष खोरे, अक्षय वर्पे, श्री. गोराणे, विशाल यादव यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com