जिल्हा परिषदेच्या 181 कर्मचार्‍यांची होणार बिनपगारी

सामान्य प्रशासनकडून लेटलतिफांवर कारवाईसाठी विभागप्रमुखांना पत्र
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेमध्ये बुधवारी सकाळी अचानक सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या पाहणीत तब्बल 181 कर्मचारी उशिरा आले आढळून आले.

या सर्वांवर सामान्य प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असून संबंधित विभाग प्रमुखांना त्यांची बिनपगारी करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयात सुमारे 350 हून अधिक कर्मचारी काम करतात. या कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक यंत्र आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक यंत्र वापरू नये, अशा सूचना शासनाकडून आल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे यंत्र बंद आहे. त्यामुळे विभागप्रमुखांच्या उपस्थित संबंधित कर्मचार्‍यांना हजेरीपटावर सही करून हजेरी द्यावी लागते.

करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेत 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू झाले होते, परंतु परिस्थिती निवळल्यानंतर ऑक्टोबरपासून पुन्हा शंभर टक्के उपस्थितीत कामकाज सुरू झाले. सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वासहा अशी कामकाजाची वेळ आहे.

दरम्यान सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी सकाळी कर्मचार्‍यांचे हजेरी पुस्तक तपासले असता त्यात सर्व विभागांचे मिळून तब्बल 181 जण उशिरा आल्याचे आढळल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांनी दिली.

यांच्यावर होणार कारवाई

सार्वजनिक बांधकाम (उत्तर) 21, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) 17, शिक्षण विभाग 21, समाज कल्याण विभागात 6, रोहयो 4, पशुसंवर्धन विभाग 8, कृषी विभाग 9, ग्रामपंचायत 10, आरोग्य विभाग 16, सामान्य प्रशासन विभाग 8, पाणी व स्वच्छता विभाग 7, अर्थ विभाग 27, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 7, महिला बालकल्याण विभाग 10, लघुपाटबंधारे विभाग 10 असे एकूण 181 कर्मचारी उशिरा आलेले आढळले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com