झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मुहूर्त आज ठरणार
सार्वमत

झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मुहूर्त आज ठरणार

ऐन करोना संकटात गर्दी रोखण्याचे आव्हान

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, नगर शहरात करोनाचा कहर सुरू असून या काळात बदल्यांच्या दरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी, असा पेच प्रशासनासमोर आहे. दरम्यान आज अध्यक्षा राजश्रीताई घुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक होऊन कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मुहूर्त ठरणार आहे.

जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी 21 ते 24 दरम्यान कालावधी निश्चित केला आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षा घुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहणार आहे. शनिवारी जिल्हा परिषदेच्या 14 विभागांतील 33 संवर्गातील कर्मचार्‍यांच्या सेवा ज्येष्ठतेची अंतरिम यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर 18 तारखेपर्यंत हरकती घेण्यास मुदत राहणार आहे.

दरम्यान, सोमवारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत प्रशासनात चर्चांची खल सुरू आहे. यंदा बदली पात्र कर्मचार्‍यांमधून 15 टक्केच कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार असून यात 10 टक्के प्रशासकीय तर 5 टक्के विनंती बदल्या करण्याची प्राथमिक चर्चा सुरू आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षा अंतिम निर्णय घेणार आहेत.

यासह बदलीची प्रक्रिया करताना ती बंदीस्त ठिकाणी की मोेकळ्या जागेवर घ्यावी, यावर देखील चर्चा होताना दिसत आहे. करोनामुळे जिल्हा परिषदेत गर्दी होणार नाही. विभागनिहाय 15 ते 20 जणांचा समूह तयार करून त्यांना समुपदेशनासाठी बोलावून त्यानुसार बदल्या करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय आज होणार असून बदल्यांच्या तारखांचा मुहूर्त देखील आज ठरणार आहे.

जिल्हा परिषदेत 31 जुलैपर्यंत कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. यादरम्यान मुख्यालयात मोठी गर्दी असून त्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी जि.प. सदस्य राजेश परजणे यांनी सीईओंकडे केली आहे. मुख्यालयातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हास्तरावरून तालुका पंचायत समित्यांच्या सहकार्याने बदल्यांबाबतची प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी. 31 जुलैपर्यंत अधिकारी, जिल्ह परिषद सदस्य व तालुका पंचायत समित्यांचे सभापती यांच्यापुरताच प्रवेश मर्यादित ठेवावा, तालुकास्तरावरील कामकाजांचे प्रस्ताव व इतर माहिती आपल्याला हवी असल्यास ती ई-मेलवरही मागवणे शक्य आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी जिल्हा परिषदेची संपूर्ण इमारत आतून-बाहेरून सॅनिटाईज करण्यात यावी. मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी एकाच प्रवेशद्वाराचा वापर करावा. प्रवेश करताना थर्मल स्कॅनिंगचा वापर सक्तीचा करावा, रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी, अशा काही उपाययोजना केल्या तर करोना संसर्गास काहीअंशी पायबंद घालता येईल, असे परजणे यांनी पत्रात सूचवले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com