झेडपीत करोनाचा दुसरा बळी, कर्मचार्‍याचा मृत्यू
सार्वमत

झेडपीत करोनाचा दुसरा बळी, कर्मचार्‍याचा मृत्यू

आठ दिवसांसाठी झेडपी सील : वरिष्ठ अधिकार्‍यासह चौघांना करोनाची बाधा

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या एका कर्मचार्‍याचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी झेडपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह आणखी चार कर्मचारी करोना बाधित सापडले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात करोना स्फोटच झाला आहे. यामुळे आठ दिवसांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्यालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेत 15 दिवसांपूर्वी पहिला करोना बाधित कर्मचारी आढळला होता. त्यानंतर मागील आठवड्यात एका वरिष्ठ अधिकार्‍याचे करोनामुळे निधन झाले. त्यामुळे मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, काल सोमवारी जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकार्‍यांसह आणखी चार कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा परिषदेचे कामकाज आणखी आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये लोकप्रिय आणि सर्वांना मदत करणार, नेहमी हसतमुख असणार्‍या कर्मचार्‍यांचा सोमवारी नगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कर्मचार्‍याला निमोणिया झाला होता. दरम्यान, रात्री उशीरा या कर्मचार्‍यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी संबंधीत कर्मचार्‍यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात पसरली आणि एकच हळहळ व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, करोना लॉकडाऊनच्या काळात हजारांच्या संख्यानेे जिल्हा भरातून लोक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आले होते. या लोकांना मज्जाव केल्यानंतर देखील ते मुख्यालयात येत होते. यामुळे जिल्हा परिषदेतील करोना संसर्गाचा धोका वाढला असून अनेकांनी स्वत: करोनाची चाचणी करून घेण्यास सुरूवात केली आहे.

बाधित आढळलेल्या चार कर्मचार्‍यांमध्ये दोन कर्मचारी हे पदाधिकार्‍यांकडील असून उर्वरित दोघे हे दोन स्वत: विभागातील आहेत. आता या कर्मचार्‍यांच्या संपर्कात कोण-कोण आहेत, त्यांची चाचणी करणे आवश्यक झाले आहे. त्याच सोबत नगर शहरात असणारी पंचायत समितीचे कार्यालय देखील बंद ठेवण्याची मागणी पंचायत समिती कर्मचार्‍यांमधून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com