झेडपी कर्मचार्‍यांच्या आजपासून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बदल्या
सार्वमत

झेडपी कर्मचार्‍यांच्या आजपासून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बदल्या

करोना संसर्गाचा परिणाम : पदाधिकार्‍यांची उपस्थिती

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही जिल्हा परिषदेत करोनाने शिरकाव केला आहे. या सर्व स्थितीचा अंदाज घेत मुख्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बदल्यांसाठी कर्मचार्‍यांची मुख्यालयातून तालुका पातळीवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आजपासून बदली प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी या ऑनलाईन प्रक्रियेला सोमवारी मान्यता दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ग्रामविकास विभागाने आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली होती. 31 जुलैपर्यंत वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठता याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या.

या याद्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज मंगळवार (दि.21) ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशनानुसार कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग प्रंचड वाढला आहे. त्यातच जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पार पाडावयाची असल्याने मुख्यालयातील गर्दी टाळण्यासाठी तालुकास्तरावरच पंचायत समिती कार्यालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचार्‍यांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना ऑनलाईन रिक्त जागांचे विकल्प दाखवून बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रशासनाने ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचार्‍यांच्या बदली तयारी आणि प्रत्यक्षात प्रक्रियेची रंगित तालीम घेतली होती. मात्र, पदाधिकारी यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा झालेली नव्हती. सोमवारी अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख आणि काशिनाथ दाते यांची मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांच्यासोबत राबविण्यात येणार्‍या व्हीडिओ कॉन्फरन्स बदल्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पदाधिकार्‍यांनी यास हिरवा कंदील दाखविला आहे.

आज समान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांनी झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांना सुरूवात होणार आहे. त्यानंतर 22 तारखेला ग्रामपंचायत आणि त्यानंतर महिला बालकल्याण व प्राथमिक शिक्षण विभाग. 23 तारखेला अर्थ विभाग आणि पशुसंवर्धन विभाग, कृषी आणि बांधकाम विभाग, 24 तारखेला लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभाग अशा बदल्या होणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com