झेडपी
झेडपी
सार्वमत

झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

समुपदेशनाने 21 ते 24 जुलैदरम्यान होणार प्रक्रिया तालुकास्तरावर 28 व 29 दरम्यान होणार बदल्या

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा करोना संसर्गाच्या संकटात कर्मचार्‍यांचे समुपदेशन बदल्या होणार आहेत. बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेच्या तारखा जाहीर केल्या असून यात 21 ते 24 जुलैदरम्यान मुख्यालयातील बदल्या होतील व त्यानंतर 28 व 29 रोजी तालुकास्तरावरील बदल्या होणार आहेत.

शासनाने यंदा 15 टक्के बदल्या करण्याचे जाहीर केले असून शिक्षक वगळता क व ड वर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. त्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी बदलीपात्र कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यावर हरकती घेऊन व त्या निकाली काढून 18 जुलैपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या समुपदेशनासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही होणार असून जिल्हा परिषदेच्या सभागृहात करोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियम पाळून समुपदेशनाची प्रक्रिया 21 ते 24 जुलैदरम्यान पार पडणार आहे. याबाबतचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांनी सर्व खातेप्रमुखांना पाठवले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नसल्याची काळजी घेणे गरजे असून समुपदेशन कक्षात केवळ बदलीपात्र कर्मचारी उपस्थित राहतील. खातेप्रमुखांनी बदलीसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून ते अंतिम करायचे आहेत. कागदपत्रांत काही गैरप्रकार झाला तर खातेप्रमुखांना जबाबदार धरले जाईल, रिक्त पदांचा अहवाल एकत्रित पाठवायचा आहे, याशिवाय तालुकास्तरावरील बदल्या 28 व 29 रोजी करण्यात याव्यात, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, तसेच तालुकास्तरावरील सर्व प्रमुख अधिकार्‍यांना दिले आहेत.

असे आहे वेळापत्रक

* 21 जुलै सकाळी 10 ते 5 सामान्य प्रशासन विभा. 22 जुलै सकाळी 10 ते 2 ग्रामपंचायत विभाग आणि

दुपारी 3 ते 6 महिला-बालकल्याण व शिक्षण विभाग.

* 23 जुलै सकाळी 10 ते 2 अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि दुपारी 3 ते 5 कृषी विभाग, बांधकाम विभाग.

* 24 जुलै सकाळी 10 ते 2 लघूपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा आणि दुपारी 3 ते 5 आरोग्य विभाग

Deshdoot
www.deshdoot.com