झेडपीमध्ये घबराट !

एका पदाधिकार्‍याच्या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह
झेडपीमध्ये घबराट !
corona

अहमदनगर | प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांचा कार्यालयातील कर्मचारी बुधवारी करोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गुरुवारी शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येवून पुढील 15 दिवस शिक्षण विभागासह पहिला मजला बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेतील पहिल्या मजल्यावर असणार्‍या विभागातील एकाकर्मचार्‍यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी जिल्हा परिषदेत आलेला नसला तरी कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी गुरूवारी दुपारी एकत्र येवून शिक्षणाधिकारी रमाकांत काटमारे यांच्याकडे गेले आणि पुढील 15 दिवस शिक्षण विभाग लॉकडाऊन ठेवण्याची मागणी केली. मात्र, या वर निर्णय घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने दुपारपर्यंत निर्णय झालेला नव्हता.

दरम्यान पुढील आठवड्यात जिल्हा परिषद प्रशासनाने 21 पासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया ठेवली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांची बदली होणार असल्याने यावेळी करोना संसर्गापासून प्रशासन कसा बचाव करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे या बदली प्रक्रियेला पदाधिकारी स्वत: उपस्थित राहणार आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यात सर्वप्रथम जिल्हा परिषदेत होणारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नव्हता.

रात्री ड्युटी करणारे कर्मचारी दिवसा झेडपीत

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचार्‍यांना नगर शहरात रात्री 12 वाजेपर्यंत करोना योध्दाच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. यामुळे हे कर्मचारी रात्री ड्युट्या करून दिवसा पुन्हा जिल्हा परिषदेत कामावर येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील करोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com