झेडपीत आळी-पाळीने काम
सार्वमत

झेडपीत आळी-पाळीने काम

करोनामुळे नियोजन : आजारी कर्मचार्‍यांना सुट्टीची मुभा

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाचा फटका बसल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने आता कामकाज एकदिवसाआड (आळी-पाळीने) करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील सुत्रांनी दिली.

जिल्ह्यात सोमवारी करोना बाधितांचा आकडा 10 हजारांच्यापुढे गेला आहे. तर जिल्हा परिषदेतही आतापर्यंत 17 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यात प्रत्येकी एका अधिकारी-कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे.

आठ दिवस दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंदच होते. काल सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू झाले. सध्या जिल्हा परिषदेत सर्व कर्मचारी कामकाजानिमित्त येत आहेत. करोनामुळे जिल्हा परिषदेत कामाचा बोजाही कमी आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची गर्दी आणखी कमी करण्यासाठी त्यांना दोन शिफ्टमध्ये बोलावता येणे शक्य आहे का? म्हणजे अर्धे कर्मचारी एक दिवस व उर्वरित कर्मचारी दुसर्‍या दिवशी असे नियोजन केले तर जिल्हा परिषेदत गर्दी कमी होईल.

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी, तसेच सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले. तसेच ज्या कर्मचाजयांना मधूमेह, रक्तदाब किंवा इतर आजार आहेत, अशा कर्मचार्‍यांनी रजेची मागणी केली तर त्यांना रजा मंजूर केली जाईल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, करोनाचा संसर्ग पाहता शिक्षकांच्या बदल्याचे भविष्य अंधारात आहे. आधीच पेसा विभागातील बदल्यांना न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. यामुळे उर्वरित जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्याचे भवितव्य अंधारात आहे. याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com