अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या काही महिन्यांपासून आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या 85 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली नव्हती.

याप्रश्नी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘सार्वमत’ने आवाज उठविला होता. अखेर प्रशासनाने या शिक्षकांना सोमवारी (दि.15) शाळांवर पदस्थापना दिली आहे. यात बहतांशी शिक्षकांची सोय झाली असून तिघांनी नकार दिला आहे.

आंतरजिल्हा बदलीने बदलून येणार्या शिक्षकांना आधी जिल्हा पातळीवर हजर करून घेण्यात येते. त्यानंतर तालुकानिहाय रिक्त असणार्या पदाच्या प्रमाणानूसार संबंधीत शिक्षकांना नेमणुका देण्यात येतात. जिल्हा परिषदेत टप्प्याने आतापर्यंत 85 प्राथमिक शिक्षक हे आंतरजिल्हा बदलीने बदलून आले.

त्यांना तालुका पातळीवर रिक्त जागांनूसार पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. यामुळे दररोज हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात असणार्या शिक्षण विभागातील हजेरी पुस्तीकेवर सह्या करून सायंकाळी घरी जातात. आता लगेच या शिक्षकांना पगार देण्यात येणार नसला तरी ते शाळेवर हजर झाल्यानंतर त्यांचा पगार काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने बदलून येणार्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया यापूर्वी दोनदा आयोजित करण्यात आली. मात्र, ही पदस्थापानेची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. काल त्याला मुर्हुत लाभला असून या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे.

सोईनुसार पदस्थापना न मिळाल्याने नकार देणार्या शिक्षकांना आता प्रशासन रिक्त जागांनूसार पदस्थाना देणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाणे, कक्षाधिकारी संभाजी भदगले यांच्यासह तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.