अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 350 जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय नसल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

शिवाय 200 शाळांमध्ये शौचालय आणि स्वच्छतागृहे असूनही त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांची वापरण्याची सोय नाही. दरम्यान, नवीन शौचालय व जे नादुरूस्त असल्याने बंद आहेत त्यांची दुरुस्ती यासाठी सुमारे 10 कोटी 25 लाखांच्या निधी आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे अहवाल पाठविलेला असून सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यावर या ठिकाणी शौचालय मिळणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या (पहिली ते आठवी) 3 हजार 573 शाळा आहेत. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह आवश्यक असून गेल्या काही वर्षांत सर्व शिक्षा अभियानातून शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यात आली.

सध्या 3 हजार 297 शाळांमध्ये मुलांसाठी, तर 3 हजार 480 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे आहेत. परंतु अजूनही 276 शाळांत मुलांसाठी, तर 93 ठिकाणी मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय 205 स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पर्यायाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही.

यापूर्वी केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा खोल्या आणि अन्य बांधकामासाठी निधी उपलब्ध होत होता. मात्र, अलिकडच्या काही वर्षात हा निधी कमी होत आहे. यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शौचालयाचा प्रश्न असणार्या शाळांनी ऑनलाइन नोंदणी करून स्वच्छतागृहे आहे किंवा नाही, तसेच दुरुस्तीसाठीचा निधी याची माहिती कळविली आहे.

त्यानुसार केंद्र सरकारकडून 60 टक्के व राज्य सरकारकडून 40 टक्के निधी मंजूर होवून तो पदारात पडल्यानंतर जिल्हा परिषदांच्या शाळांचा हा प्रश्न निकाली निघणार आहे. येत्या जूनपर्यंत निधीची मिळण्याची शक्यता शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली.

जिल्ह्यात असणार्या प्राथमिक शाळा येथील शौचालय व स्वच्छतागृहांपैकी 147 मुलांचे व 58 मुलींचे असे एकूण 205 स्वच्छतागृहांचे दुरवस्था झाली असून, ते वापराविना आहेत. पाण्याची सोय नसणे, पडझड, दरवाजे नसणे, अस्वच्छता अशा अनेक कारणांनी ही स्वच्छतागृहे बंद आहेत. सरासरी 50 हजार रुपये प्रतिस्वच्छतागृहप्रमाणे सुमारे सव्वाकोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च अपेक्षित आहे. तर नवीन शौचालयासाठी प्रत्येकी दोन लाखांपर्यंतच्या निधीची आवश्यकता आहे.