झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी अभ्यास गट

नवीन शाळा खोल्या प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी तिघांची निवड
झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी अभ्यास गट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढ व्हावी, यासाठी राज्यात यापूर्वी अनेक अभियान राबविण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यात अभियान राबविण्याचा प्रयत्न आहे. राबवण्यात येणारे गुणवत्ता वाढीचे अभियान, त्याचे नाव, कालावधी, स्वरूप ठरविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी संभाजी लांगोरे यांचे झेडपीच्या शाळांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष असून त्यांच्या सुचनेतून प्रयोग करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेत सोमवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक काळातील शिक्षण समितीच्या सल्लागार समितीची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या शिक्षण अभ्यास गट समितीमध्ये कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, मुख्यालयातील विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, मनिषा कुलट यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभ्यास गट समितीच्या सदस्या गुणवत्ता वाढीसाठी अभ्यास करून अहवाल देणार आहेत.

यासह बैठकीत जिल्ह्यातील नवीन शाळांच्या बांधकामाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. जेणे करून कोणत्या ठिकाणी शाळा खोल्यांची गरज आहे हे ठरविण्यासाठी आणि गुणांकन देण्यासाठी जामखेडचे गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी सर्व शिक्षा अभियान आणि संबंधीत लिपीक यांच्यावर जवाबदारी सोपविण्यात आली आहे. या तिघांनी शाळा खोल्यांची निकड लक्षात घेवून गुणांकन करून नव्याने शाळा खोल्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात फायदा होणार असल्याचा सूर बैठकीत उमटला.

जिल्ह्यातील 5 हजार 313 शाळांपैकी 4 हजार 703 शाळांनी शाळासिध्दी स्वयंमुुल्यमापन पूर्ण केलेले आहे. उर्वरित 610 शाळांनी तात्काळ स्वयंमूल्यमापण पूर्ण करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. प्राथमिक शाळा खोल्या बांधकामे, दुरस्तींची कामे वेळत पूर्ण होण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या 5 हजार 370 शाळांपैकी 5 हजार 289 शाळांनी नोंदणी केली असून त्यातील 5 हजार 208 शाळांनी फायनल सबमिशन केलेले आहे. त्यातील 363 फाईव्ह स्टार शाळांची विस्तार अधिकारी यांच्या मार्फत मुल्यांकन करुन पुरस्कारासाठी शाळा निवडण्याच्या सुचना देण्यात आल्या.

यात जिल्हा स्तरावर 38 शाळा निवडण्यात आल्या असून यात पहिल्या 14 शाळांची नावे राज्य स्तरावर स्तरावार पाठवण्याचे प्रस्तावित असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी ऑनलाईन अ‍ॅप व स्वच्छ विद्यालय पोर्टलवर माहिती भरण्यात येणार आहे. निकषानुसार हे काम 1 ते 15 मे तारखेपर्यत करण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क कायदा अनुषंगाने दिनांक 1 मे 2022 पासून निर्गमीत होणार्‍या अधिसूचनेनुसार कार्यवाही करुन जास्तीत जास्त प्रसिध्दी द्यावी. माहिती अधिकार कायद्या प्रमाणेच या कायद्याचे काम देखील आहे,

या कायद्यान्वये विद्यार्थी लाभाच्या सेवा 35 व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा 75 अशा एकूण 105 सेवा निश्चीत केल्या आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर वेळेत माहिती न दिल्यास दंड करण्याची देखील तरतुद असल्याने सर्वानी डेटाबेस तयार करावा. यासाठी सरल पोर्टल मधील माहिती अद्यावत करावी, जेणे करुन जनतेला कमी वेळेत जास्तीत जास्त सुविधा देता येतील. सर्व शाळांनी या लोकसेवा हमी कायदयाचे बोर्ड सर्व शाळेत लावावेत, अशा सुचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.