आरोग्य अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी

शेळके : हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई
आरोग्य अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपकेंद्र स्तरावर आरोग्य अधिकार्‍यांची नेमणूक झालेली आहे. त्यांनी उपकेंद्र स्तरावर मुख्यालयी राहून चोख सेवा द्यावी. या काळात आरोग्य अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर केला तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी दिल्या.

उपाध्यक्ष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 21) दुपारी 1 वाजता आरोग्य समितीची आढावा बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. त्यावेळी शेळके यांनी अनेक सूचना केल्या. करोना साथीच्या आजाराबरोबरच इतर साथीच्या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुणिया अशा कीटकजन्य आजारांच्या बाबतीत आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत नियमित सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

तालुकास्तरावर करोना रुग्णांसाठी उपलब्ध कोव्हिड केअर सेंटरमधील खाटांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. गोरगरिब रुग्णांचे या साथरोगजन्य स्थितीमध्ये हाल होणार नाहीत, याची काळजी सर्व आरोग्य दुतांनी घ्यावी, तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी स्वत:ची काळजी घेऊन कोव्हिड रुग्णांची सेवा करावी, असे बैठकीत शेळके यांनी सांगितले.

बैठकीचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी पाहिले. समितीचे सदस्य सीताराम राऊत, पंचशिला गिरमकर, कविता लहारे, सविता अडसुरे, पुष्पा वराळ, रामााऊ साळवे, सोमनाथ पाचारणे, नंदा गाडे यांनी चर्चेत भाग घेतला. कुष्ठरोग संचालक डॉ. शरद काळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सुनील पोटे आदी बैठकीला उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com