करोना
करोना
सार्वमत

झेडपी अधिकार्‍याचा मृत्यू, पत्नीवरही उपचार सुरू

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा परिषदेमधील कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकार्‍याचा मंगळवारी करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर नगरच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर मंगळवारी दिवसभरासाठी जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले. यासह मृत अधिकारी प्रमुख असलेल्या ‘त्या’ विभागातील सर्व कर्मचार्‍यांची करोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करोनामुळे मृत पावलेले संबंधित अधिकारी हे अत्यंत हुशार, शांत स्वभावाचे होते. जिल्ह्यात वेगवेगळ्या पंचायत समितीमध्ये त्यांनी काम केलेले होते. सध्या ते राहुरी पंचायत समितीत कार्यरत होते. मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या एका विभागाचा प्रभारी चार्ज त्यांच्याकडे होता.

साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने केलेल्या चाचणीत ते करोना बाधित आढळले होेते. त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झालेली होती. या दोघांवर नगरमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पत्नीवर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा परिषदेत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज बंद ठेवण्यात आले. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या त्या विभागातील सर्व कर्मचार्‍यांची करोना टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तीन दिवस हा विभागच बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचार्‍यांना आधीच करोनाची बाधा झालेली आहे. त्यात आता एका अधिकार्‍याचा बळी गेला असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह पंचायत समितीतील कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या दोन ठिकाणी शिफ्टनुसार कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी राज्य जिल्हा परिषद युनियनच्या नगर शाखेच्यावतीने अध्यक्ष विकास सांळुके, भारत बोरूडे, भारती सांगळे, किशोर शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांच्याकडेे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com