झेडपी
झेडपी
सार्वमत

महिनाअखेरपर्यंत झेडपी अभ्यागतांसाठी बंद !

झेडपीच्या 15 जणांना करोनाची बाधा : दोघांचा मृत्यू

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेत करोनाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत करोना बाधितांची संख्या 15 वर पोहचली आहे. यात एका अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तर उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेत अभ्यागतांना बंदी घातली आहे.

जिल्हा परिषदेत करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यालय आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच झालेला आहे. तसेच कर्मचार्‍यांनी शक्य तितके वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले असून शासन निर्देशानुसार 50 वर्षांपुढील ज्या कर्मचार्‍यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारासारखे त्रास आहेत, त्यांना रजेची सवलतही देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा गाडा हाकणारे मुख्यालयातच करोनाबाधित वाढल्याने कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावण्याच्यादृष्टीने विशेष प्रयत्न करत आहे.

जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकारी, कर्मचार्‍यांसह अभायागतांचा मोठा राबता आहे. पहिल्या दोन महिन्यांत या ठिकाणी करोनाचा संसर्ग नव्हता. मात्र, जुलै महिन्यापासून जिल्हा परिषद मुख्यालयातील काही कर्मचारी करोनाबाधित होण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेत करोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले नाही.

मागील काही दिवसांत तब्बल 15 जण बाधित झाल्याने सर्वच अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील आठ दिवस कामकाज बंद ठेवत वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होणार असला तरी कर्मचार्‍यांच्या मनात असलेली भिती दूर होणे गरजेचे आहे. पदाधिकारी, सदस्य कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत येत असतात. त्यांनाही आता मुख्यालयात न येताच काही काळ कामकाज पहावे लागणार आहे.

प्रशासन कर्मचार्‍या पाठिशी : वासुदेव सोळंके

जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी यांनी घरीच थांबून काळजी घेणे अपेक्षित आहे. विनाकारण बाहेर फिरणे टाळले पाहिजे. करोनाचे संकट गंभीर असले तरी प्रशासन सर्व कर्मचार्‍यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने कर्मचार्‍यांनी घाबरुन जावू नये. कोणाला लक्षणे जाणवल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले आहे.

31 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषद मुख्यालय अभायागतांसाठी पुर्णपणे बंद राहील. कार्यकारी अभियंता यांना याबाबत सुरक्षेचे आदेश दिले आहेत. 8 तारखेपर्यंत मुख्यालयाचे कामकाज कर्मचार्‍यांनी घरूनच करावे. ग्रामपंचायत, क्षेत्रीय, पंचायत समिती कार्यालयांनी मुख्यालयाशी ऑनलाईन, इंटरनेट, व्हाटस्आपद्वारे संपर्कात रहावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com