शासनाने नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी - परजणे

शासनाने नुकसाग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी - परजणे

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे (Kharip Crops) व फळबागांचे (Orchards) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक गांवामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरुन अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे शासन पातळीवरुन तातडीने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील (ZP Member Rajesh Parjane) यांनी केली.

तहसीलदार विजय बोरुडे (Tahsildar Vijay Borude) यांना दिलेल्या निवेदनात श्री परजणे पाटील (ZP Member Rajesh Parjane) यांनी कोपरगांव तालुक्यात अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कोपरगांव तालुक्यातील (Kopargav Taluka) ओढ्या नाल्यावरील छोटे मोठे के. टी. वेअर्स, शेततळी, गांवतळी तसेच शेतातील चर तुडुंब भरुन वाहत आहेत. उभ्या शेतपिकांसह जमिनी पाण्याखाली गेल्याने शिवारे जलमय झाली आहेत. काढणीला आलेले सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, तूर, उडीद, मूग, भूईमूग पिके वाया गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, कपडे, मुलांची पुस्तके, वह्या अशा संसारोपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर पडले आहेत. जनावरांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक शेतातल्या केळी, डाळींब, पपई, चिक्कू, पेरुच्या बागा कोलमडून पडल्या आहेत. भाजीपाला पिके अक्षरश: सडून गेली आहेत. शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान (Loss) झालेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अचानक हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा उतरवलेला असताना बर्‍याच शेतकर्‍यंना अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

मागील वर्षीच्या नुकसान झालेल्या पिकांचीही भरपाई अद्याप मिळालेली नाही. अतिवृष्टी आणि पुरामुळे पुन्हा शेतकर्‍यांना संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यांना आर्थिक मदतीशिवाय पर्याय राहिलेला नाही.नुकसान झालेल्या शेती पिकांचे, फळबागांचे तसेच उद्ध्वस्त झालेल्या घरांचे तालुका कृषी विभाग, महसूल विभाग, गटविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याबाबत सूचना देवून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी श्री परजणे (ZP Member Rajesh Parjane) यांनी केली.

Related Stories

No stories found.