जादा सेवाशुल्क आकारल्यास गडाख टोचणार इंजेक्शन
सार्वमत

जादा सेवाशुल्क आकारल्यास गडाख टोचणार इंजेक्शन

पशूवैद्यक तक्रारी : झेडपीतील बैठकीत कारवाईचा निर्णय

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या जिल्हा परिषद आणि खासगी पशूवैद्यक यांना सेवा शुल्क आकारणी ठरवून दिलेली आहे. मात्र, अनेक ठिकाणी शासकीय नियमापेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.

यामुळे जादा शुल्क आकारणी करणार्‍या जिल्ह्यातील पशूवैद्यक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे. तसेच जादा शुल्क घेणार्‍यांची नावे जिल्हा परिषदेला कळवा, असे आवाहन सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि पशूपालकांना केले आहे.

शुक्रवारी जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची सभा सभापती गडाख यांचे अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यावेळी सदस्य दिनेश बर्डे, रावसाहेब कांगुणे, सोनाली रोहमारे, संध्या आठरे, शांताबाई खैरे, श्रीम वंदना लोखंडे, सुनिता दौंड व सचिव डॉ. सुनिल तुंबारे इ. सभेमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन सहभागी होऊन चर्चा केली. यात वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अर्ज मागवले होते.

हे अर्ज पंचायत समितीस्तरावर 31 जुलैपर्यंत सादर करण्याची मुदत दिली होती. परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लाभधारकांना हे अर्ज मुदतीत सादर करता आले नाहीत. त्यामुळे पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सदस्यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज सादर करण्यास आता 14 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे.

लाभार्थ्यांनी आता दिलेल्या मुदतीत त्यांचे अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. मुदत वाढवून दिल्यामुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा अंदाज पशु संवर्धन समितीने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूधन असून या पशूधनाला जिल्हा परिषदेकडील पशूवैद्यक आणि खासगी वैद्यक यांच्याकडून सेवा पुरविण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या पशूला पूरविण्यात येणार्‍या सेवांचे दर निश्चित करून देण्यात आलेले आहेत.

मात्र, अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचे पशूवैद्यकांसह खासगी व्यक्ती अधिक सेवा शुल्क आकारात आहे. यामुळे अशा सर्व संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग आहे. याबाबतचा ठराव शुक्रवारच्या पशूसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले.

काही तालुक्यांमध्ये अजूनही पशूधनाचे घटसर्प, फर्‍या रोग प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. येत्या आठ दिवसांमध्ये हे दोन्ही प्रकारचे लसीकरण पूर्ण करावेत, अशा सूचना पंचायत समिती स्तरावरील पशूसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com