झेडपी
झेडपी
सार्वमत

ग्रामपंचायतींमार्फत दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचा झेडपीचा प्रस्ताव

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे मागविले मार्गदर्शन

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या करोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांसाठी ग्रामपंचायतीमार्फत दुभत्या जनावरांची खरेद-विक्री करता येईल का याबाबत सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे मार्गदर्शन मागण्याचा निर्णय जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सभापती सुनील गडाख यांनी दिली.

सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पशु आणि अर्थ समितीची मासिक बैठक पार पडली. बैठकीत वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या लाभार्थींचे अर्ज पशुवैद्यकीय दवाखानास्तरावर स्विकारण्याचा निर्णय झाला. यासाठी महिनाअखेर म्हणजेच 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2019 ते 31 एप्रिल 2020 या कालावधीत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात आला. यात राज्यात सर्वाधिक काम नगर जिल्ह्याने केलेले आहे. राज्यात कृत्रिम रेतनांचे काम 88.50 टक्के झाले असून जिल्ह्यात हे काम 188.43 टक्के झाले आहे.

जिल्ह्यासाठी 20 हजार लक्षांक असताना जिल्ह्यात 301 गावांत 37 हजार 685 कृत्रिम रेतन केलेले आहे. यासह घटसर्प, फर्‍या रोग प्रतिबंधक लसीकरण 100 टक्के काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक दवाखान्या अंतर्गत 50 जनावरांची, पशुपालकांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद सेसमधून वैयक्तीक लाभाच्या योजनांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध योजनांचे पूर्ण विनियोजन करणे बाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात सद्यस्थितीत जनावरांचे बाजार बंद आहेत. त्यामुळे विविध शासकीय योजने अंतर्गत दुभती जनावरे, शेळ्या खरेदी थांबलेली आहे. याबाबत राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन ग्रामपंचायत मार्फत करता येईल का? याबाबत मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय झाला. बैठकीला सदस्या संध्याताई आठरे, सोनालीताई रोहमारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदनाताई लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनीताताई दौंड आणि सचिव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे उपस्थित होते.

अर्थ समितीच्या बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. जून 2020 मधील जिल्हा परिषद अर्थ संकल्पीय तरतुदींच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. अर्थ विभागातील लेखाविषयक नोंद वहयांचे अवलोकन करण्यात आले.जिल्हा परिषद सेव व जिल्हा नियोजन मधून 2019-20 मधील योजनानिहाय खर्चाचा आढाव घेण्यात आला. तसेच 2020-21 मधिल 33 टक्के निधी व माहीती देण्यात आली. या सभेसाठी सभापती सुनिल गडाख, सदस्य राजेश परजणे, शरद नवले, कोमलताई वाखारे, कैलासराव वाकचौरे सचिव मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.श्रीकांत अनारसे उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com