जि.प. शिक्षण विभागाचा बैठकीपासून पळ

भाजपा गटनेता वाकचौरे यांचा आरोप
जि.प. शिक्षण विभागाचा बैठकीपासून पळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या दोन महिन्यांपासून करोना कमी झाला असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या बैठका वेळेवर होत आहेत. परंतु, शिक्षण विभाग महत्त्वाचा विभाग असूनही शिक्षण समितीची बैठक घेण्यास अधिकारी, पदाधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे भाजप गटनेता जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

विषय समित्यांच्या बैठका एक महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असताना गेल्या दोन वर्षांत करोनामुळे समक्ष बैठका झाल्या नाहीत. तुरळक बैठका ऑनलाईन घेण्यात आल्या. आता करोना कमी झाला तरी शिक्षण समितीची बैठक झाली नाही. शिक्षण हा महत्त्वाचा विषय असून त्याकडे मात्र अधिकारी, पदाधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करतात. शिक्षण विभागाचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.

महाराष्ट्रात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यात त्यामुळे जिल्ह्यातल्या शाळा सुरू करणे, पोषण आहार, ऑनलाईन शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, आदर्श शिक्षक पुरस्कार, आरोग्यविषयक समस्या असे अनेक विषय असताना शिक्षण समितीची बैठक मुद्दाम पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असल्याचा आरोपही वाकचौरे यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com