zp
zp
सार्वमत

जिल्हा परिषदेमध्ये अभ्यागतांना बंदी !

काही विभाग केले दोन दिवसांसाठी बंद

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍याचा बुधवारी करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली असून प्रशासनाने मुख्य इमारतीमधील काही विभाग दोन दिवसांसाठी बंद केले आहेत. तसेच पुढील दोन दिवसांसाठी जिल्हा परिषदेत अभ्यागतांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गुरूवारी शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन पुढील 15 दिवस शिक्षण विभागासह पहिला मजला बंद ठेवण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेतील पहिल्या मजल्यावर असणार्‍या विभागातील एका कर्मचार्‍याचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी जिल्हा परिषदेत आलेला नसला तरी कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी गुरूवारी दुपारी एकत्र येऊन शिक्षणाधिकारी रमाकांत काटमारे यांच्याकडे गेले आणि पुढील 15 दिवस शिक्षण विभाग लॉकडाऊन ठेवण्याची मागणी केली. मात्र, यावर निर्णय घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने निर्णय झालेला नव्हता.

नगर शहरात करोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्हा परिषदेतील अभ्यागतांची गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. गुरूवारी सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हा परिषदेत करोनाचा संसर्ग अधिक असणार्‍या ग्रामीण भागातून अभ्यागत जिल्हा परिषदेत आल्याचे समोर आले. यामुळे पुढील दोन दिवस जिल्हा परिषदेत केवळ पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरितांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात जिल्हा परिषद प्रशासनाने 21 पासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया ठेवली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांची बदली होणार असल्याने यावेळी करोना संसर्गापासून प्रशासन कसा बचाव करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. जिल्हा परिषदेत गर्दी टाळण्यासाठी व्हिडीओ कॉॅन्फरन्सिंगद्वारे बदल्या करण्याचा पर्याय प्रशासनाकडे असून त्यावर गंभीरपणे विचार करण्याची मागणी कर्मचार्‍यांमधून होत आहे. तालुका पातळीवरील कर्मचार्‍यांना नगर मुख्यालयातून ऑनलाईन संपर्क साधून त्याव्दारे समुदेशनाने बदलीची प्रक्रिया पार पडू शकते.

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचार्‍यांना नगर शहरात रात्री 12 वाजेपर्यंत करोना योध्दाच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. यामुळे हे कर्मचारी रात्री ड्युट्या करून दिवसा पुन्हा जिल्हा परिषदेत कामावर येत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतील करोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com