अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचे रुग्ण जसे झपाट्याने वाढत आहेत तसेच जिल्हा परिषदेतही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.

गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत 16 करोना पॉझिटिव्ह आढळले असून यात दक्षिण बांधकाम विभागातील आठ जणांचा समावेश आहे. त्यामुळे हा विभाग 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला असून कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मंगळवारी बांधकाम दक्षिण विभागाला खेटून असणार्या विभागातील एक अधिकारी करोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महिनाभरापूर्वी दररोज शंभरच्या आसपास असलेला रुग्णांचा आकडा आता 800 च्या पुढे गेला आहे.

त्याला जिल्हा परिषदही अपवाद नाही. जिल्हा परिषदेत अर्थ विभाग, दक्षिण बांधकाम विभाग, अध्यक्षांचे कार्यालय, लघु पाटबंधारे अशा विविध ठिकाणी सुमारे सोळाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दक्षिण बांधकाम विभागातील आठ जण, तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन यासह अन्य विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे.

बांधकाम दक्षिण विभागात सर्वाधिक रुग्ण सापडल्याने हा विभाग 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वरील कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. खूपच आवश्यक असणार्या कर्मचार्यांना दुसर्या विभागात शिफ्ट केले आहे.

वर्दळ कमी होईना...!

जिल्हा परिषदेत सध्या मार्चएण्डचे वारे वाहत आहे. यामुळे याठिकाणी ठेकेेदारांची रेलचेल असून यातून बांधकाम विभागात गर्दी होताना दिसत आहे. करोना संसर्गामुळे बांधकाम दक्षिण विभाग बंद करण्याची वेळ आली. मात्र, उत्तर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे डोळे उघडलेले नाहीत. याठिकाणी अधिकारी सर्रासपणे ठेकेदारांना घेवून बसत असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने संबंधितांना सूचना देण्याची मागणी होत आहे.