अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत सध्या पाच विभागांच्या प्रमुखांची पदे रिक्त असल्याने तेथे प्रभारीराज सुरू आहे.

त्यामुळे या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करणार्या अधिकार्यांना आपला मूळ कार्यभार सांभाळून अतिरिक्त वेळ द्यावा लागत असून त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. अनेक दिवसांपासून राज्य सरकार पातळीवरून या नियुक्या केलेल्या नाहीत.

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, बांधकाम (दक्षिण) विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह पाथर्डी व अकोले येथील गटविकास अधिकारी ही पदे सध्या रिक्त आहेत.

या सर्व ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून इतर अधिकारी कामकाज पाहत आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे हे सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून तेथील प्रभारी पदभार उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्याकडे आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची औरंगाबाद येथे पदोन्नतीने उपसंचालकपदी बदली झाली. त्यामुळे त्यांचा पदभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाली. परंतु अजूनही येथे अधिकारी नियुक्त नसून सध्या हा पदभार देविदास कोकाटे यांच्याकडे आहे. बांधकामचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता डी. एम. गावडे यांची ऑगस्टमध्ये पंढरपूर येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर पंढरपूर येथून पी. जी. चव्हाण यांची नगरला बदली झाली.

परंतु ते हजरच झाले नाहीत. त्यामुळे सध्या हा पदभार नेवाशाचे उपकार्यकारी अभियंता सुधीर पाटील यांच्याकडे आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अन्वर तडवी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त असून सध्या येथे एम. जी. सराफ प्रभारी आहेत. महत्वाच्या विभागांची पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

परंतु शासनाने अद्याप या जागांवर अधिकार्यांची नियुक्ती केलेली नाही. यासह पाथर्डी व अकोले येथील गट विकास अधिकारी पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त असून तेथेही प्रभारीराजच आहे. त्यामुळे तालुक्यातील कामकाजावर परिणाम होत आहे.