झेडपीत बदल्यांची तयारी सुरू, ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा

उद्या होणार कार्यालयीन अधीक्षक आणि कक्ष अधिकार्‍यांची बैठक
झेडपीत बदल्यांची तयारी सुरू, ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी बदल्या हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मनाप्रमाणे आणि हव्या असणार्‍या विभागात, तालुक्यात बदली मिळावी, यासाठी कर्मचार्‍यांचे प्रयत्न असतात. दुसरीकडे प्रशासन सेवाज्येष्ठता आणि नियमांवर बोट ठेवून कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पारपडत असतात. यंदा देखील मे महिन्यांत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची प्रक्रिया पारपडणार असून त्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. यासाठी आज (सोमवारी) जिल्हा परिषदेत सर्व विभागाचे अधीक्षक आणि कक्ष अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पारपडण्यची जबाबदारी ही सामान्य प्रशासन विभागाची आहे. यापूर्वी शिक्षकांच्या बदल्या देखील सामान्य प्रशासन विभागामार्फत होत असत. मात्र, गेल्या काही वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून एकाच वेळी होत असल्याने सामान्य प्रशासन विभागाची डोकदुखी कमी झाली आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने बदली पात्र कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द केली असून त्यावर हरकती घेण्यासाठी आज (दि.25) शेवटची मुदत आहे. सामान्य प्रशासन विभाग कर्मचार्‍यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी तपासून दाखल हरकतींवर सुनावण्या घेवून 2 मे रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणार आहेत.

दुसरीकडे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांपैकी आरोग्य विभागातील कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या प्रशासकीय बदल्या होत नसल्याने या विभागातील कर्मचार्‍यांना हा दिलासा असून ग्रामविकास विभागाकडून दरवर्षी बदलीचे सुत्र निश्चित करून त्याबाबतचे पत्र सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात येते. त्यानूसार बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येत असते. नगर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला ग्रामविकास विभागाच्या पत्राची प्रतिक्षा असून ते पत्र आल्यानंतर लगेच कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पारपडणार आहे.

दरवर्षी सामान्यपणे कर्मचार्‍यांच्या दहा टक्के विनंती आणि दहा टक्के प्रशासकीय बदल्या होत असतात. यंदा ही टक्केवारी वाढण्याची शक्यता कर्मचार्‍यांना आहे. साधारपणे दरवर्षी नगर जिल्हा परिषदेत सर्व विभाग म्हणून 200 ते 250 च्या जवळपास कर्मचार्‍यांच्या बदल्या होत असतात. यासाठी रिक्त जागांचा तपशील दाखवून सेवाज्येष्ठतेनूसार समुपदेशनाने कर्मचार्‍यांची बदल्या होत असतात.

जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग कर्मचार्‍यांच्या बदल्यासाठी सज्ज झाला असून सेवा ज्येष्ठा याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती घेवून बदल्यासाठी कर्मचार्‍यांच्या याद्या तयार करून ठेवण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाचे बदल्यासंदर्भात आदेश येताच बदल्याची पारदर्शक पध्दतीने प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

- संदिप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग.

Related Stories

No stories found.