
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तिन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया धिम्म्या गतीने का होईना सुरू आहे. आतापर्यंत शिक्षकांच्या संवर्ग एक ते तीनपर्यंतच्या बदली पात्र शिक्षकांची बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता संवर्ग चारच्या बदल्या होणार असून या संवर्गात शिक्षकांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात या बदल्या होणार आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले आहे.
कोविड संसर्गाचे दोन वर्षे आणि तिसरे वर्षे ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत रखडल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत संवर्ग एक ते तीन यातील बदली पात्र 662 गुरूजीची बदली झालेल्या आहेत. आता संवर्ग चार ज्यात सर्वाधिक शिक्षकांची संख्या असून या शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. या संवर्गात तीन टप्प्यात शिक्षकांच्या बदल्या होणार असून यातील पहिल्या टप्प्यातील बदली पात्र शिक्षकांना ऑनलाईन प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी 21 ते 26 जानेवारी दरम्यान मुदत आहे. त्यानंतर ऑनलाई प्रणालीत 27 ते 31 जानेवारीदरम्यान संवर्ग चारच्या पहिल्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहेत.
त्यानंतर याच संवर्गातील दुसर्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार असून यात पात्र शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत विस्तापित होणार्या शिक्षकांना अर्ज करण्यासाठी 2 ते 7 फेबु्रवारी दरम्यान मुदत राहणार आहे. त्यानंतर 8 ते 12 फेबु्रवारीदरम्यान, विस्तापित होणार्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रातील रिक्त असणार्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात सुगम क्षेत्रात 10 वर्षे काम केलेल्या (अवघड क्षेत्राच्या बाहेर काम करणारे) शिक्षकांची यादी जाहीर करणे, आणि अवघड क्षेत्रातील बदलीची प्रक्रिया पारपडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी 23 फेबु्रवारीला प्रकाशित होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या बदल्या
संवर्ग 1- 299
संवर्ग 2- 172
संवर्ग 3- 191
संवर्ग 4 बदली प्रक्रिया होणे बाकी
एकूण 662