
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या नियमित जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेल्या स्थानांतरण बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी 59 कर्मचार्यांच्या विभागांतर्गत स्थानांतरण बदल्या केल्या.
जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या 17 ते 20 मे दरम्यान झाल्या. यात एकूण 290 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर स्थानांतरण बदल्यांची प्रक्रिया प्रशासनाकडून हाती घेतली जाणार होती. मात्र त्याला मुहूर्त लागत नव्हता. स्थानांतरण बदल्यानुसार मुख्यालयात एकाच विभागात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचार्यांना दुसर्या विभागात, तर एकाच टेबलवर तीन वर्षे झालेल्या कर्मचार्यांना विभागांतर्गत दुसर्या टेबलवर हलवले जाते.
जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर लगेच स्थानांतरण बदल्या होतील, अशी अपेक्षा कर्मचार्यांना होती. मात्र त्यानंतर जूनअखेर पंचायत राज समितीचा दौरा जाहीर झाला. दौर्याची तयारी म्हणून आवश्यक त्या माहितीची विभागनिहाय जुळवाजुळव करण्यासाठी संबंधित कर्मचारी आवश्यक असल्याने या बदल्या पीआरसी दौर्यानंतर करण्याचे प्रशासनाने ठरवले. मात्र हा दौराच रद्द झाला. त्यामुळे 1 जुलैला स्थानांतरण बदल्या होतील, अशी शक्यता होती. मात्र या बदल्या पुन्हा लांबणीवर पडल्या.
अखेर 11 जुलै रोजी सीईओ येेरेकर यांनी 59 कर्मचार्यांच्या स्थानांतरण बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सहाय्य केले.
सर्वाधिक 14 कर्मचारी शिक्षण विभागाचे
बदलीपात्र सर्वाधिक 14 कर्मचारी प्राथमिक शिक्षण विभागातील, त्यानंतर आठ जण सामान्य प्रशासन, 10 जण बांधकाम विभाग, 5 जण आरोग्य, 5 जण ग्रामीण पाणीपुरवठा, 1 पशुसंवर्धन, 3 ग्रामपंचायत, 1 लघुपाटबंधारे, 3 कृषी, 1 महिला बालकल्याण, 1 देखभाल दुरुस्ती, 1 यांत्रिकी, तर 1 रोहयो विभागातील कर्मचारी बदलीस पात्र होता. या सर्वांच्या विभागांतर्गत बदल्या रिक्त पदांचा समतोल साधून करण्यात आल्या.