
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेच्या आरोग्यसह अन्य विभागातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मागील महिन्यात ग्रामविकास विभागाने परवानगी दिली. या भरतीसाठी साधारणपणे 1 हजार 200 पेक्षा जास्त जागा निघणार असून यासाठी सध्या जिल्हा परिषद प्रशासनाचे विभागनिहाय रोष्टर (बिंदूनामावली) तपासण्याचे काम सुरू आहे. यात पाच विभागाचे रोष्टर तपासून पूर्ण झाले असून चार विभागांचे येत्या 15 दिवसांत रोष्टर तपासून पूर्ण करण्यात येणार आहे.ग्रामविकास विभागाच्यावतीने दिलेल्या भरतीच्या वेळापत्रकात डिसेंबरअखेर भरतीसाठी रोष्टर तपासून पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय बिंदू नामावली आणि रिक्तपदानुसार आरक्षण निश्चित करणे आणि तदनुषंगिक सर्व कामे 31 जानेवारी 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 आठवडा 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत भरतीसाठी रिक्त जागांची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. जाहीरात प्रसिध्द झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून 14 दिवसात म्हणजेच 8 ते 22 फेब्रुवारी अर्ज मागवण्यातय येणार आहे.
त्यानंतर एका आठवडा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान आलेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व जिल्हा निवड मंडळाने एका महिन्यांत म्हणजे 6 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान प्रत्यक्षात भरती घ्यावयाची आहे. शेवटी 14 ते 30 एप्रिल या दरम्यान परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर 31 मेपर्यंत प्रत्यक्षात पात्र उमेदवारांना नेमणुकीचे आदेश देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सध्या जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात धावपळ सुरू आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने सामान्य प्रशासन, आरोग्य, पशूसंर्वधन, महिला आणि बालकल्याण तसेच अर्थ विभागाचे रोष्टर तपासून पूर्ण केले आहेत. तर येत्या 15 दिवसात ग्रामपंचायत, बांधकाम, कृषी आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे रोष्टर तपासून पूर्ण करणार आहे. शुक्रवार (दि.9) रोजी ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेवून भरतीसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा देखील घेतलेला आहे.
दरम्यान, रोष्टर (बिंदूनामावली) म्हणजे कोणत्या विभागात कोणत्या बिंदू नामावलीनूसार आरक्षण द्यावयाचे हे ठरवण्यात येते. यासाठी प्रत्येक विभागाचे आरक्षणानूसर रोष्टर तयार करून ते नाशिकला विभागीय आयुक्त यांच्या सहीने अंतिम करता येते. रोष्टर अंतिम झाल्याशिवाय भरती प्रक्रिया अशक्य आहे.