462 अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी प्रकाशित

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू
462 अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी प्रकाशित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेने जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रकाशित केली. त्यानुसार जिल्ह्यात 462 अवघड क्षेत्रांतील शाळा आहेत. यात सर्वाधिक 298 शाळा अकोले तालुक्यातील असून त्या खालोखाल संगमनेर 87, पारनेर 21, तर श्रीगोंदा तालुक्यातील 16 शाळांचा समावेश आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया उरकल्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. यात पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 462 अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी जाहीर झाली आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा करोनाचे कोणतेही सावट नसल्याने ऑगस्टमध्ये शासनाने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आता ग्रामविकास विभागाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार 31 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रकाशित करायची होती. ती यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रकाशित केली. याशिवाय 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर होणार आहे. पहिल्या दिवशी ती झाली नव्हती. त्यामुळे 1 नोव्हेंबरला दिवसभरात ही यादी जाहीर होईल. त्यानंतर जिल्ह्यात किती बदलीपात्र शिक्षक आहेत, हा आकडा समोर येईल. अवघड क्षेत्रातील शाळांच्या शिक्षकांना बदल्यांत प्राधान्य दिले जाते.

दरम्यान, संवर्ग 1, संवर्ग 2 व सर्वसाधारण अशा तीन टप्प्यांत या बदल्या ऑनलाइन पोर्टलवर होणार आहेत. संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील बदलीपात्र शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रसिध्द झाल्यानंतर शिक्षकांना ती पाहायला मिळेल. त्यावर काही आक्षेप असतील तर शिक्षकांना आधी शिक्षणाधिकारी व नंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे दाद मागता येणार आहे. दरम्यान, दोन वर्षांनंतर बदल्यांची प्रक्रिया होत असल्याने सर्वच बदलीपात्र शिक्षकांत समाधान व्यक्त होत आहे. त्यातही गेल्या अनेक वर्षांपासून अवघड क्षेत्रात अडकलेले शिक्षक बाहेर पडणार असल्याने या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या

अकोले 298, जामखेड 7, कर्जत 2, नगर 2, नेवासा 1, पारनेर 21, पाथर्डी 7, राहुरी 17, संगमनेर 87, शेवगाव 4, श्रीगोंदा 16.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com