जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या घटतेय

खासगी शाळांच्या स्पर्धेत होतेय पीछेहाट
जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थ्यांची संख्या घटतेय

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मागील वर्षीच्या तुलनेत 23 पैकी 17 केंद्रांत विद्यार्थी संख्या घटली आहे. पारनेर तालुक्यासह जिल्हाभरात ही स्थिती असून खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांची पीछेहाट होताना दिसत आहे.

पारनेर तालुक्याला शिक्षणाचा मोठा वारसा लाभला आहे . तालुक्याचा काही भाग दुर्गम व दुष्काळी असूनही शिक्षणाची ज्ञान गंगा खेडोपाडी, वाडी- वस्तीवर अगदी आदिवासी पाड्यावर पोहचली आहे. परंतु काळानुसार वाढत्या लोकसंख्येनुसार या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढ होणे अपेक्षित आसताना विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. याला खाजगी शाळाचे ग्रहण लागले आहे. परंतु जिल्हा परिषद शाळांचाही दर्जा खालावत चालल्याची बोंब पालक करत आहेत. पारनेर तालुक्यात एकूण 23 केंद्रांपैकी 17 केंद्रांवरील पहिली प्रवेशाची संख्या घटलेली असून तालुक्यातील कर्जुले हर्या, खडकवाडी, पळवे खुर्द, रांजणगाव मशिद, लोणीमावळा, वनकुटे या केंद्रांनी पटसंख्या वाढली आहे बाकी 17 केंद्रांवर पटसंख्या घटली आहे हे आजच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 334 शाळा असून यात 15 हजार 461 विद्यार्थ्यांना 875 शिक्षक शिक्षण देत आहेत. तालुक्यात अलिकडच्या दहा वर्षांचा विचार केला तर लोकसंख्या वाढीचे प्रमाण मोठे आहे. परंतु त्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. याबाबत काही जाणकार पालकांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, 90 टक्के शिक्षक शाळेच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यात बहुतांश शिक्षकांचीच मुले इंग्रजी शाळांमध्ये जात आहेत.

त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संवाद हा मोजकाच घड्याळाच्या काट्याप्रमाणे मार्यादीत राहिला आहे. पूर्वी शिक्षक शाळेच्या वेळे व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांमध्ये मिसळत असत. आता मात्र त्यांना वेळ नाही. ते केवळ ड्युटी करत आहेत. याला काही शिक्षक आपवाद आहेत. तालुक्यात आजही काही शाळा आदर्श व खाजगी शाळांच्या तोडीत चांगल्या आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

जिल्हा परिषद शाळाची पट संख्या कमी होण्यास काही मुख्य कारणे आहेत. यात पालकाची मानसिकता, जिल्हा परिषद शाळेतील दर्जा व खाजगी शाळांची स्पर्धा या काही मुख्य गोष्टी जिल्हा परिषद शाळाची पटसंख्या कमी होण्यास कारणीभूत असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

आज रोजी चालू वर्षीची पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी प्रवेश चालू असून जुलै अखेरपर्यंत पट संख्या मागील वर्षी इतकी होईल.

- निळकंठ बोरुडे, प्रभारी गट शिक्षण अधिकारी पारनेर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com