
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
मुलांच्या शिक्षणाचं काहीही होवो, आम्हाला आमची राजकीय न केलेल्या कामाची हौस भागवायची हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून जबाबदार आजी-माजी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा सुरू असताना विनापरवानगी कार्यक्रम घेतात, याबाबत जबाबदार अधिकार्यांनी चौकशी करून योग्य तो गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी करून बाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ठिय्या मांडला.
माजी आमदार कर्डिले व खा डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत बाभुळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना व इतर विकास कामांचे भूमिपूजन 28 फेब्रुवारी रोजी पार पडले. कार्यक्रमानंतर त्याच रस्त्याने जात असलेले आ. प्राजक्त तनपुरे यांनी शाळेला भेट दिली असता तेथील मुले कार्यक्रम स्थळावरील खुर्च्या व चटया उचलताना दिसून आले. शाळा व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता विद्यार्थी वर्गात असताना शाळा सुरू असताना कोणाच्या परवानगीने जबाबदार पदाधिकार्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. असा जाब आमदार तनपुरे यांनी विचारला.
वास्तविक शाळेचे वर्ग सुरू असण्याच्या कालावधीत कार्यक्रम घेता येतो का? यासाठी परवानग्या लागतात. याचीही दखल घेतली गेली नसल्याची खंत वाटते. शाळेच्या प्रांगणात मंडप घातला गेला. स्टेज, खुर्च्या, स्पीकर आदी व्यवस्था करताना कोणाची परवानगी घेतली गेली? जिल्हा परिषदेच्या लहानग्या मुलांच्या शाळेची गुणवत्ता व इतर गोष्टी सांभाळणे हे जबाबदार लोकप्रतिनिधीचे काम आहे. याचाही विसर संबंधितांना पडल्याची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिली आहे. घडलेली बाब चुकीची असून याबाबत जे जबाबदार असतील त्यांचेवर योग्य ते गुन्हे दाखल करू, असे आश्वासन आपल्याला जिल्हा परिषदेच्या जबाबदार अधिकार्यांनी दिल्यामुळे नंतर आपण शाळा परिसर सोडला, असे आ. तनपुरे यांनी सांगितले.
वास्तविक, ज्या कामांची उद्घाटने झाली त्याची आपल्याला किती माहिती आहे. या खोलात आता मी जात नाही. परंतु, कार्यक्रमात घ्यायचा असेल तर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जोरात घ्यायचा होता. लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान योग्य आहे का? लोकप्रतिनिधींसाठी या राज्यात एक अलिखित आचारसंहिता कायदे असतात, याचे भान संबंधितांनी ठेवलेले दिसत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करून आयोजकांवर योग्य ते गुन्हे गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. ते पूर्ण करावे, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, सचिन भिंगारदे, आबासाहेब वाघमारे, दिलीप जठार, बाळासाहेब जठार, आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भानुदास वाघमारे, पंढरीनाथ पाटोळे, सलीम शेख, रामदास माने, संदीप पाटोळे, बाबासाहेब ससाणे, सचिन वाघमारे, अनिल माने, ईश्वर कुसमुडे, नवनाथ ढगे जगदीश भालेराव, विजय कदम बंटी अडसूरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.