गुरुजींच्या बदल्यांसाठीची माहिती ग्रामविकास विभागाला सादर

जिल्हा परिषद : बदली पात्र शिक्षकांचे पुढील प्रक्रियेकडे लक्ष
गुरुजींच्या बदल्यांसाठीची माहिती 
ग्रामविकास विभागाला सादर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट करण्यात आली असून ही अद्यावत माहिती ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आली आहे. यामुळे बदली पात्र शिक्षकांच्या आता बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी 17 मार्चला ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची व्हिडीओ कॅन्फरंसव्दारे बैठक घेतली होती. या व्हीसीला ग्रामविकास विभागाचे सचिव कुमार, उपसचिव प्रवीण जैन, के.जी. वळवी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे उपस्थित होते. यात 12 विषयांवर चर्चा झाली होती. शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायसनूसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्यावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानिकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानूसार शिक्षकांच्या नेमणूका करणे आदी विषयाचा समावेश होता.

या सुचनानूसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व माहिती अद्यावत करून बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांच्या जन्म तारीख, बारा अंकी आधार नंबर, पॅन नंबर, शालार्थ आयडीत तसेच शाळा बेस आणि शिक्षक बेस माहिती तयार करून ती ग्रामविकास विभागाला सादर केली आहे. दरवर्षी साधारणपणे 31 मेच्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोविडच्या संसर्गामुळे नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षकांसाठी बदल्या ही मोठी बाब असून बदलीत शिक्षकांची गैरदूर होते. शिक्षकांच्या बदलीत चार प्रकार असून संवर्ग एक आणि दोन पत्नी-पत्नी एकत्रिकरण आणि सेवाज्येष्ठतेने शिक्षकांना बदली करता येते. दोन वर्षापासून बदली होत नसल्याने शिक्षकांना मोठ्या गैरसोयीला समोरे जावे लागत होते.

अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यासाठी मागील वर्षीच्या अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीचा आधार घेण्यात येणार आहे. यावर्षी अवघड क्षेत्रात येणार्‍या शाळांच्या यादीच्या आधारे पुढील वर्षीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. यामुळे यंदा अवघड क्षेत्रात मोडणार्‍या शाळांच्या शिक्षकांसाठी हा तोटा ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com