
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी 50 हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली होती. यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून भरतीची पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागासोडून अन्य विभागाच्या रिक्त जागांसाठी भरती झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी 15 दिवसांपासून ग्रामविकास विभागाकडून प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी घाई करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अंतिम झाल्यावर प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता व्यक्त आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राज्यात रिक्त असणार्या प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया झालेली नाही. शिक्षण परिषदेच्यावतीने साधारण 2010 ला शिक्षकांची थेट भरती केली होती. त्यानंतर कोविडच्या आधी 2018 ला पवित्र पोर्टलव्दारे शिक्षण सेविकांची पदे भरण्यात आली. यात नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदलीने शिक्षक वेटींगवर असल्याने नगर जिल्ह्यात पवित्र पोर्टलव्दारे उर्दू भाषेची मोजकी पदे भरण्यात आली होती. दरम्यान, भरती नसल्याने नगर जिल्ह्यात राज्यात पदवीधर प्राथमिक शिक्षकांचा वणवा निर्माण झाला आहे. पदवीधर शिक्षकांअभावी अनेक ठिकाणी सहावी ते आठवीच्यापर्यंतच्या शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सामान्यांच्या मुलांना खासगी शाळांकडे वळण्याची वेळ आली आहे. संभाव्य धोका ओळखून शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी राज्यातील रिक्त असणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा केलेली आहे.
दरम्यान, शिक्षकांची भरती हा शिक्षण विभागाचा निर्णय असला तरी हे पद ग्रामविकास विभागाच्या अख्यारित असल्याने या पदाची बिंदूनामावली अंतिम केल्यावर त्याला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर बिंदूनामावलीनूसार रिक्त पदांची माहिती शालेय शिक्षण विभागाला सादर केल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदासाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. ही प्रक्रिया ग्रामविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने पूर्ण करण्यात येते. यासाठी गेल्या 15 दिवसांपासून नगर जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून शिक्षकांची बिंदूनामावली तातडीने पूर्ण करण्यासाठी व्हिसीव्दारे सुचना देण्यात येत आहे. बिंदूनामावली पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून घाई करण्यात येत असून शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी भरतीची प्रत्यक्ष घोषणा नसली तरी भरती पूर्व तयारीचा भाग म्हणून प्रवर्गानूसार रिक्त जागांचा तपशील अंतिम करण्यात येत आहे.
ही माहिती पूर्ण झाल्यावर शालेय शिक्षण विभागाला प्रवर्गानूसार रिक्त जागा कळवण्यानंतर भरतीसाठी प्रत्यक्ष कार्यावाही सुरू होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग वगळून अन्य रिक्त जागांसाठी पुढील आठ दिवसात ग्रामविकास विभागाकडून जाहीरात काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात पुढील काही महिन्यांत ही भरती झाल्यानंतर रिक्त असणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग तयारी करत आहे. नगर जिल्हा परिषदेत बिंदूनामावलीनूसार 604 शिक्षकांच्या जागा रिक्त होण्याची शक्यता असून यात निम्म्या जागा या पद्वीधर विज्ञान विषयाच्या शिक्षकांची राहणार असून उपाध्यपक पदाच्या मोजक्या जागा निघण्याची शक्यता आहे.
सध्या शिक्षकांच्या रिक्त जागांच्या भरतीबाबत थेट कोणतीही घोषणा नसली तरी पुढील महिन्यांत शिक्षकांच्या भरतसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 ऑगस्टनंतर भरतीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात शिक्षकांच्या 600 च्या पुढे जागा रिक्त असून या जागांच्या 50 टक्के जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे.