अहमदनगर (प्रतिनिधी) -

शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात जिल्हा परिषद

परिचर कर्मचारी संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवला.

शुक्रवारी परिचर संवर्गातील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने केली. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह पदाधिकार्यांनी आंदोलक कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.

यावेळी जि.प. परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड, सागर आगरकर, सुरेश भोजणे, निलेश गाडेकर, चंद्रकांत पाचारणे, श्रीकांत ढगे, ऋषीकेश बनकर, श्यामसुंदर शेळके, लहानू उमाप, मिरा पतंगे आदी उपस्थित होते.

शासनाने वर्ग 4 ची पदे निरसित करू नये, चतुर्थश्रेणीची 25 टक्के पदे निरसित करण्याचा 14 जानेवारी 2016 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, चतुर्थश्रेणी सेवांचे व कर्मचार्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करू नये, अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट तात्काळ करावी, वेतनत्रुटीसंदर्भातील खंड 2 च्या अहवालाची अंमलबजावणी करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी, सन 2005 नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचार्यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.