जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची वाजू लागली घंटा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची वाजू लागली घंटा

राहुरी तालुक्यात विखे-कर्डिले विरूद्ध तनपुरे गटात होणार राजकीय धुमश्चक्री || संभाव्य आरक्षणावर इच्छुकांचा डोळा; विधान परिषदेतील इच्छुक पुरविणार उमेदवारांचे चोचले

उंबरे | दत्तात्रय तरवडे| Umbare

डिसेंबरमध्ये आरक्षण आणि जानेवारीत प्रत्यक्ष घोषणा होणार असल्याने राहुरी तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणांसह जिल्हा परिषदेच्या पाच गटांत आता निवडणुकीची जोरदार राजकीय धुमश्चक्री बघायला मिळणार आहे.

दोन नगरपालिका आणि एका साखर कारखान्याच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचीही घंटा वाजू लागली आहे. त्यामुळे आता राहुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील वातावरण या ऊबदार थंडीतही गरमागरम बनणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना आरक्षणाचे वेध लागले असून विधान परिषदेपूर्वीच या निवडणुकांचे सोपस्कार आटोपणार असल्याने विधान परिषदेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून असलेल्या इच्छुक नेत्यांना अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुकांचे ‘चोचले’ पुरवावे लागणार आहेत. त्यामुळे संपूर्णतः ग्रामीण भाग ढवळून काढणार्‍या या निवडणुका तेवढ्याच मनोरंजक ठरणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यात आगामी जि.प. व पं.स. निवडणूक कशा पध्दतीने लढविली जाईल? याबाबत राजकीय खलबते सुरू झाली आहेत. माजी खासदार प्रसादराव तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे, माजी आ.शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठनेते अ‍ॅड. सुभाष पाटील, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आदी प्रमुख नेते काय भूमिका घेणार? यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी विरुध्द भाजप की आणखी काही स्थानिक आघाड्या? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मागील फेब्रुवारी 2017 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली. तर साधारण डिसेंबर 2016 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता कोणत्या गटात कोणते आरक्षण जाहीर होणार? याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच संभाव्य इच्छुक नावे समोर येतील, अशी चर्चा आहे.

राहुरी तालुक्यात पंचायत समितीवर सध्या माजी खा. प्रसादराव तनपुरे यांचे वर्चस्व आहे. तर जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी तीन गट विखेंकडे तर दोन गट तनपुरे गटाकडे आहेत. त्यामुळे आता विखे-कर्डिले व तनपुरे गटाने या निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. विखे-कर्डिले गटाकडून पंचायत समितीच्या सत्तेसाठी आरपारची लढाई होणार आहे. तर सत्ता राखण्यासाठी तनपुरे गटही तेवढाच प्रयत्नशील राहणार आहे. जिल्हा परिषदेत निवडून येणारे सदस्य विधान परिषदेचे नूतन मतदार असल्याने विधान परिषदेला इच्छुक असलेल्या उमेद्वारांच्या रडारवर हे सदस्य राहणार आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणांचे आरक्षण साधारणपणे डिसेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून बदलत्या राजकीय समिकरणांमुळे निवडणुका महाविकास आघाडीविरुध्द भाजप अथवा पक्षीय पातळीवर की स्थानिक आघाडी करून लढविल्या जाणार? याची चर्चा होत आहे.

राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण आहेत. यामध्ये (कंसात सध्याचे आरक्षण) वांबोरी (सर्वसाधारण महिला) या जि.प.गटात एकूण बारा गावे असून उंबरे (सर्वसाधारण) व वांबोरी (सर्वसाधारण) हे दोन गण आहेत. टाकळीमिया(अ.ज. महिला) या जि.प. गटात एकूण पंचवीस गावे असून कोल्हार खुर्द (सर्वसाधारण महिला) व टाकळीमिया (ना.मा.प्रवर्ग महिला)हे गण आहेत. ब्राम्हणी (अ.ज.) या जि.प.गटात एकूण वीस गावे असून आरडगाव (सर्वसाधारण) व ब्राम्हणी (ना.मा.प्रवर्ग ) हे दोन गण आहेत. सात्रळ (सर्वसाधारण महिला ) जि.प. गटात एकूण एकवीस गावे असून गुहा (अ.जा. महिला ) व सात्रळ (ना.मा.प्रवर्ग महिला)हे दोन गण आहेत. बारागाव नांदूर (ना.मा.प्रवर्ग) जि.प.गटात एकूण अठरा गावे असून बारागाव नांदूर (सर्वसाधारण महिला) व डिग्रस (अ.ज.) हे दोन गण आहेत.

राहुरी तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर विखे-कर्डिले विरूद्ध तनपुरे गटात अनेकदा राजकीय संघर्ष बघायला मिळतो. मात्र, सध्या असलेल्या राज्यातील सत्तेच्या जोरावर तनपुरे गट वरचढ ठरलेला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर तनपुरेंचा वरचष्मा आहे. त्यामुळे आता संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विखे-कर्डिले गटाला अटीतटीची लढत द्यावी लागणार आहे. तर तनपुरे गटासाठी ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे.

Related Stories

No stories found.