जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूक प्रक्रिया सुरू

प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर, राजकीय घडामोडींना वेग येणार || गट, गण रचना करताना 2011 ची जनगणना विचारात घेणार || अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे विभाजन न करण्याचे निर्देश
जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूक प्रक्रिया सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जानेवारी अथवा फेब्रुवारी 2022 मध्ये होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचे ( गट आणि गण ) प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले आहेत. 30 नोव्हेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे आदेश निवडणुक होणार्‍या जिल्हयातील जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. या आदेशामुळे राज्यातील मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वक प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगर जिल्ह्यात 73 जिल्हा परिषद गट आणि 146 पंचायत समिती गणासाठी येत्या जानेवारी अथवा फेब्रुवारीत निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार सुरू असून विविध पक्षांतील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अधिनियमनानुसार जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकली जावू शकत नाही. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने वेळेतच निवडणुका घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे 2011 च्या जनगणनेच्या आधारे गट आणि गणाची रचना करायची असल्यामुळे सध्याच्या मतदारसंघ संख्येमध्ये बदल होणार नाही, अशीच शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशात 30 नोव्हेंबरपूर्वी प्रभागरचना तयार करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीची कार्यवाही करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता निवडणुका या मुदत समाप्तीपूर्वी पार पडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

सध्या महाविकास आघाडीची सत्ता

जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी, उपाध्यक्षपद काँग्रेस, अर्थ व पशू संवर्धन समिती शिवसेना, बांधकाम व पशुसंवर्धन समिती शिवसेना, समाजकल्याण समिती राष्ट्रवादी, महिला बालकल्याण समिती काँग्रेसकडे आहे.

निवडणूक एकत्र की स्वतंत्र हे ऐनवेळी

राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र की स्वतंत्र लढणार याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जाहिर केलेले नाही. यामुळे याबाबत ऐनवेळी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगर जिल्हा परिषदेत 21 मार्च पुर्वी नविन अध्यक्ष बसविणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होवून नविन अध्यक्ष यांची निवड करणे जिल्हा परिषद अधिनियमानुसार बंधनकारक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com