झेडपीच्या जुन्या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी हवेत पाच कोटी

पुण्याच्या कमलदाणी आर्किटेक संस्थेने तयार केला आराखडा
झेडपीच्या जुन्या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी हवेत पाच कोटी

अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

लाहोर विद्यापिठाच्या धर्तीवर 1933 साली साकारलेली आणि राज्यातील एकमेंव मॉडेल असलेल्या नगर जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या सुशोभिकरणाचा प्रश्न कायम आहे. मध्यांतरी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेवून पुण्याच्या कमलदाणी आर्किटेक या संस्थेमार्फत या इमारतीचा सुशोभिकरणाचा आराखडा तयार देखील केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर या विषयाला चालना मिळालेली नाही. या इमारतीच्या सुशोभिकरण आणि नुतनणीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची गरज आहे.

नगर जिल्हा परिषदेची जुनी इमारत ही राज्यातील मोजक्या देखण्या शासकीय इमारतीपैकी एक आहे. इमारतीच्या वैशिष्ट्य म्हणजे 2 एकर 17 गुंठ्याच्या परिसारात ही इमारत उभारण्यात आलेली आहे. या इमारतीसाठी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी निधी उपलब्ध करून दिलेला होता. इमारतीचे बांधकाम 27 ऑगस्ट 1929 सुरू होवून अवघ्या चार वर्षात 24 मार्च 1933 ही वास्तू उभी राहिली. या इमारतीचे प्लिंथचे क्षेत्रफळ 7 हजार 627 चौरस फुट आहे.

त्यावेळी इमारतीसाठी 69 हजार 269 रुपये खर्च आलेला आहे. दरम्यान, त्यावेळी जिल्हा लोक बोर्डाच काम या इमारतीतून सुरू राहायाचे. अगदी 2007 पर्यंत याच इमारतीच्या दालनात बसून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काम पाहिलेले आहे. मात्र, याच इमारती शेजारी नव्याने भव्य इमारत बांधण्यात आल्यानंतर झेडपीच्या जुन्या इमारत रिकामी करण्यात आली. या ठिकाणी सध्या नगर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे आणि समाज कल्याण विभागाचे असे दोन कार्यालय सुरू आहे. उर्वरित इमारतीचा वापर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या रेकॉर्ड ठेवण्यासाठी अथवा रिकाम्या खोल्यांना कुलूप लावून त्या बंद आहेत.

साधारणपणे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी या इमारतीच्या नुतणीकरण आणि सुशोभिकरणाचा विषय हाती घेतला. यासाठी पुण्याच्या कलमदाणी आर्किटेक या संस्थाला सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्यास सांगितला. त्यानूसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात इमारतीच्या बांधकामात आवश्यक ते दुरस्त्या व चाचण्या करून पुण्याच्या कौन्सिल हॉल सारखे काम सुचवण्यात आलेले आहे.

तसेच इमारतीच्या जवळ असणारे पेव्हर ब्लॉक काढून जमीनीची पातळी खाली घेवून त्याठिकाणी बेसाल्ट दगडात फरशी बसवणे प्रस्तावित केलेली आहे. तसेच इमारतीच्या दगड कामावरचा रंग काढून इतर दुरूस्त्या करून विद्यूतीकरण आणि सुशोभिकरण सुचवण्यात आलेले आहे. इमारतीमधील साधी शहाबाद फरशी ही रुमाल पध्दतीने मूळ इमारतीमध्ये लावण्यात आलेली आहे.

ही तशीच ठेवून साफ करून वापरण्यात येवून या वास्तूच्या दालनात जिल्ह्याचा समृध्द वारसा याठिकाणी प्रदर्शित करणे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. कमलदाणी संस्थेने या इमारतीच्या सुशोभिकरणाचा सात कोटी 50 लाखांचा आरखडा तयार केला असली तरी पहिल्या टप्प्यात 5 कोटी मिळाल्यास या इमारतीच्या सुशोभिकरणाला सुरूवात करता येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन अथवा ग्रामविकास विभागाकडून खास बाब म्हणून निधी मिळण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या इमारतीवर असणारे घड्याळ नगर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याची ओळख असणारे हे घडळ्या गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या कार्यकाळात हे घड्याळ बंद पडले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईहून तंत्रज्ञ बोलावून नगरची ओळख असणारे जिल्हा परिषदेचे धडधड असणारे हे घड्याळ पुन्हा सुरू केले होते.

नगर जिल्ह्याला जसा मोठा राजकीय वारसा आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीला मोठा वारसा आहे. अध्यक्षा असतांना जुन्या इमारतीतून काम करण्याचा योग आला नाही. मात्र, खरोखर जिल्हा परिषदेची जुनी इमारत देखणी आणि प्रशस्त आहे. याठिकाणी हवा नेहमी खेळती राहते. यामुळे या ऐतिहासिक इमारतीच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच ग्रामविकास विभागाकडे मागणी करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

- शालिनीताई विखे पाटील, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com