झेडपी पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ संपला

सोमवारपासून प्रशासक राज; कर्मचारी, वाहने अन् बंगले घेणार ताब्यात
झेडपी पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ संपला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळातील कार्यालयीन कामकाजाचा गुरूवार हा शेवटचा दिवस होता. आज शुक्रवारी धुलीवंदन, उद्या धुलीवंदन आणि शनिवार- रविवारी शासकीय सुट्टी असल्याने गुरूवारी पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. दरम्यान, रविवारी अधिकृतपणे मुदत संपल्यानंतर सोमवारपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येणार आहे. यामुळे पदाधिकारी यांच्या कार्यालयाकडे असणारे प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी यांना त्यांच्या मूळ पदावर सोडण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची मुदत रविवारी 20 मार्चला संपत आहे. आजपासून तीन दिवस सुट्टी असल्याने गुरूवार सदस्यांसाठी शेवटचा कार्यालयीन दिवस होता. काल उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती उमेश परहर आणि मीरा शेटे यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावत शेवटच्या दिवशी कामकाज केले. रविवारी तांत्रिकदृष्ट्या मुदत संपल्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह चार सभापती यांची सहा वाहने, सहा बंगले हे प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. तसेच पदाधिकार्‍यांच्या कामकाजासाठी घेण्यात आलेले 8 कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर सोडण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, पदाधिकारी यांच्या कार्यालयातील दूरध्वनी केवळ इनकमींग सुरू राहणार आहेत.

मागील पंचवार्षिला जिल्हा परिषदेचे दोन गट कमी झाल्याने 73 सदस्य निवडून आले होते. त्यात देखील 3 जिल्हा परिषद सदस्य हे करोनात दगावले होते. त्याआधी एक सदस्य हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले होते. यामुळे शेवटपर्यंत जिल्हा परिषदेचे 69 सदस्य शिल्लक राहिले होते. आता राज्य सरकारच्या नवीन धोरणामुळे 2011 च्या लोकसंख्येनुसार नव्याने गट आणि गणाची रचना करण्यात येणार असल्याने दहा जिल्हा परिषद गट आणि 20 गण वाढणार आहेत. तर सहा महिन्यांपूर्वी कर्जत आणि जामखेड तालुक्यात एकएक गटांची वाढ करण्यात आली असल्याने जिल्ह्यात आता 85 गट तयार होणार असून 170 गणांची निर्मिती होणार आहे. यामुळे मोठ्या संख्याने येणार्‍या निवडणुकीत इच्छुकांना संधी मिळणार आहे.

काही गोव्यात तर काही उत्तर भारतात

सोमवारपासून जिल्हा परिषदेचे काही पुरूष सदस्य हे गोव्याच्या अभ्यास दौर्‍यावर तर महिला सदस्यांचे शिष्टमंडळ सध्या उत्तर भारताच्या दौर्‍यावर आहेत. साधारण शनिवारी हे सदस्य पुन्हा जिल्ह्यात परतणार आहे. एरवी सभेत एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करणार्‍या सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी मात्र शेवट गोड केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांची बदली झाल्याने प्रशासनातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com