
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक लागू आहे. त्यातच सरकारमध्ये सातत्याने होणार्या फेरबदलामुळे काही अधिकारी यांचा गैरफायदा घेत मंत्र्यांची नावे पुढे करत मनमानी करण्याचे दिसून येत असून याठिकाणी प्रशासक काळात विविध विभागाचे अधिकारी हे गैरकारभार करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केला आहे.
याबाबत झावरे यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेतली असून त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला आहे. त्यावर येरेकर यांनी दोन दिवसात या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे झावरे यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत झावरे यांनी येरेकर यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून विविध कामांच्या निविदा धूळ खात पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यात संबंधित अधिकारी या निविदा विशिष्ट ठेकेदाराला काम मिळत नाही म्हणून उघडत नाहीत. बांधकाम विभागात विशिष्ट कर्मचार्यांची चलती असून हा प्रकार अंत्यत गंभीर असून शासन निर्णयाची पायमल्ली आहे. बांधकाम विभागासारखी परिस्थिती पाणी पुरवठा विभागात सुरू असून जलजीवनच्या अनेक कामांना ठेकेदारांनी मंजूरी दिलेली नाही.
पूर्वी जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि सदस्यांना चुकीच्या कामाबाबत जाब विचारण्यात येत होता. आता या गैरप्रकाराबाबत कोणाकडे विचारणा कराची असे झावरे यांचे म्हणणे आहे. तसेच जिल्हा परिषद सेस, 15 वा वित्त आयोग याचे अनुदान आणि त्याच्या व्याजाचे नियोजन याबाबत जिल्हा परिषदेने श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी झावरे यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, झावरे यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी समजून घेत त्यावर दोन दिवसांत संबंधीतांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे झावरे यांनी सांगितले.