यंदा अवघ्या 277 कडबाकुट्टींना अनुदान

सर्वाधिक संगमनेरला तर सर्वात कमी जामखेडला
यंदा अवघ्या 277 कडबाकुट्टींना अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या कडबाकुट्टी योजनेला यंदा कात्री लागली आहे. यामुळे शेतकर्‍यांना 277 कडबाकुट्टी यंत्राला अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कडबाकुट्टी या संगमनेर तालुक्यात मिळणार असून सर्वात कमी यंत्र हे जामखेड तालुक्याला मिळणार आहेत.

कृषी विभागाने गत वर्षीच्या तुलनेत यंदा कडबाकुट्टीच्या तरतुदीत निम्म्याने कात्री लावण्यात आली असल्याने शेतकर्‍यांची आता कडबाकुट्टीसाठी धावधाव करावी लागणार आहे. त्यातच जिल्हा परिषदेवर प्रशासक राज असल्याने शेतकर्‍यांनी कडबाकुट्टीसाठी कोणाकडे वशिला लावायाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांपैकी कडबाकुट्टी योजना ही खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी सदस्यांमध्ये या योजनेच्या लाभावरून ताणाताणी होत असते.

माझ्या गटात जास्तीजास्त कडबाकुट्टी मिळाव्यात यासाठी सदस्यामध्ये वाद झालेले जिल्हा परिषदेने पाहिलेले आहे. मात्र, यंदा 52 लाख तरतुदीवरून कडबाकुट्टी योजनेसाठी केवळ 25 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याने पर्यायाने अनुदानीत कडबाकुट्टीला शेतकरी मुकणार आहेत. दरम्यान, कृषी विभागाशी याबाबत संपर्क केला असता जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला अवघे 57 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी कडबाकुट्टी योजनेला मोठी मागणी असल्याने विभागाला मिळालेल्या एकूण 57 लाखांच्या तरतूदीपैकी 25 लाख रुपये कडबाकुट्टीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

कृषी विभागाने लोकसंख्या आणि 85 जिल्हा परिषद गट गृहीत धरून कडबाकुट्टी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. यात सर्वाधिक लाभ संगमनेर तालुक्याला मिळणार असून याठिकाणी 31 कडबाकुट्टी यंत्राला अनुदान मिळणार आहे. तर सर्वात कमी कडबाकुट्टी यंत्रे हे श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी आणि कर्जत तालुक्याला मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी कडबाकुट्टीचे अनुदान हे तालुक्याला वर्ग केले असून त्याठिकाणी पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना कडबाकुट्टीचे अनुदान मिळणार आहे.

असा मिळतो लाभ

जिल्हा परिषद कृषी विभाग हा सेस फंडातून शेतकर्‍यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना राबवते. या योजनेत बाजारातून शेतकर्‍यांनी कडबाकुट्टी यंत्र खरेदी करून त्या यंत्राच्या मूळ किंमतीचे 50 टक्के अनुदान अथवा जास्तीजास्त 9 हजार रुपयांपर्यंत अनुदान शेतकर्‍यांना देण्यात येते. दरवर्षी शेतकर्‍यांमध्ये या योजनेसाठी मोठी स्पर्धा असते. तसेच सदस्य देखील आपल्या गटात जास्ती जास्त अनुदान मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.

तालुकानिहाय यंत्र संख्या आणि कंसात अनुदान

अकोले 19 (1 लाख 71 हजार), संगमनेर 31 (2 लाख 79 हजार), कोपरगाव 19 (1 लाख 71 हजार), राहाता 19 (1 लाख 71 हजार), श्रीरामपूर 17 (1 लाख 53 हजार), राहुरी 20 (1 लाख 80 हजार), नेवासा 25 (2 लाख 25 हजार), शेवगाव 17 (1 लाख 53 हजार), पाथर्डी 17 (1 लाख 53 हजार), कर्जत 17 (1 लाख 53 हजार), जामखेड 12 (1 लाख 8 हजार), श्रीगोंदा 22 (1 लाख 80 हजार), पारनेर 20 (1 लाख 98 हजार) आणि नगर 22 (1 लाख 98 हजार) असे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com