
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत निविदा प्रक्रियेत कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्रालयाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या प्रकल्प संचालक सुषमा सातपुते यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. दरम्यान, एकट्या नगर जिल्ह्यात या मिशनमध्ये सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
नगर जिल्हा परिषदेच्यावतीने जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्या आहेत. यात सुमारे 850 कोटी रुपयांचा घोटाळा निविदा प्रक्रियेत करण्यात आला आल्याचा आरोप ठाकरे गटाचे जाधव यांनी केला होता. या कामांच्या निविदा मंजूर करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात जिल्हा दौर्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाधव यांनी तक्रार केली होती.
ठेकेदार यांना क्षमतेपेक्षा जास्त कामे देणे, पुरेशा निविदा आलेल्या असतानाही निविदा प्रक्रिया रिव्होक करून पुन्हा निविदा मागवणे, ठराविक कामासाठी एखाद्या ठेकेदाराला अपात्र करणे व दुसर्या निविदेसाठी त्याला पात्र ठरवणे, बोगस वर्क डन जोडणे यावरून सर्व निविदा प्रक्रिया पूर्णपणे मॅनेज करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केलेला आहे. त्यामुळे या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. तसेच जिल्ह्यातील भाजप आमदार व त्याच्या पीएने या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा व सुमारे 150 कोटींची कामे स्वत:च्या व इतरांच्या नावावर घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
त्यानंतर नगर येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही जल जीवनबाबत तक्रार असल्यास चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शासनाच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या प्रकल्प संचालक सातपुते यांनी जिल्हाधिकार्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जबाबदार असून, जिल्हाधिकारी हे या मिशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रकरणी नियमानुसार चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
पाच तासांच्या उलट तपासणीनंतर आ. पवारांचा इशारा
जलजीवन मिशन योजना कार्यक्रमातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील किमान 25 योजनांची कामे नित्कृष्ट पद्धतीने सुरू आहेत. या कामात येत्या महिनाभरात सुधारणा करा, शहानिशा करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा सरपंच व कार्यकर्त्यांसह आंदोलन करावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची गुरुवारी भेट घेऊन दिला. आ. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह कर्जत-जामखेड मतदारसंघातील जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन मतदारसंघातील कामांची माहिती घेतली. जलजीवन मिशन संदर्भात पत्रकारांन माहिती देताना आ. पवार यांनी सांगितले, महाराष्ट्रात जे अपवादात्मक तालुके आहेत की ज्या ठिकाणी सर्व गावांसाठी पाणी योजना मंजूर झाले आहेत, त्यामध्ये कर्जत-जामखेडचा समावेश आहे. लहान योजना 170 मंजूर झाल्या आहेत. परंतु त्यातील किमान 25 योजनांची कामे निष्कृष्ट पद्धतीने होत आहेत. त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. जलवाहिन्या निकृष्ट पद्धतीच्या आहेत. त्या जमिनीत खोलवर गाडल्या गेलेल्या नाहीत. विहिरींची प्रस्तावित कामे ही योग्य पद्धतीने होत नाहीत. ही सर्व परिस्थिती सीईओंच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या संदर्भातील छायाचित्रेही आ. पवार यांनी सीईओकडे दिली.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन आमदार पवार यांनी कुकडी व सीना कालव्याच्या कार्यक्षेत्रात पाणीटंचाई जाणवत आहे, कुकडीचे आवर्तन सुटले असले तरी योग्य दाबाने आवर्तन सुरू नाही, याकडे लक्ष वेधले. कर्जत-जामखेडसाठी 33 हजार शिधापत्रिकाधारकांचा वाढीव इष्टांक प्राप्त झाला आहे. मात्र त्यातील 40 टक्के लाभार्थ्यांना अद्यापि धान्य मिळत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले.
ठाकरे यांच्या घोषणेला मुख्यमंत्र्यांकडून हताळ- जाधव
नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिका नगरच करावे. 1995 मध्ये नगरच्या सभेत आमचे आणि आपलेही श्रद्धास्थान हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला शिंदे तुम्ही हरताळ फासला आहे. केवळ मतांच्या राजकारणापायी शिवसेनाप्रमुखांचा आदेश तुम्ही मानत नाही. त्यांचे नेतृत्व तुम्ही अमान्य करता आहात का? असा खोचक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र भावनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आले. यावरून महाराष्ट्रभर गदारोळ झाला. ही राजकीय चूक झाकणासाठी शहराची नावे बदलण्याचा खटाटोप केला आहे. नगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी आपण सामान्य नगरकरांना विश्वासात घेतले होते का? केवळ धनगर समाजाची मते पदरात पाडून घेण्यासाठी अहिल्यादेवी नगर करण्याचा घाट घालण्यात आला, असा आरोप जाधव यांनी केला आहे.